‘त्या’ ४८ कुटुंबीयांच्या जिवाशी खेळ नको - आयुक्त
By admin | Published: August 11, 2014 03:30 AM2014-08-11T03:30:55+5:302014-08-11T03:30:55+5:30
त्या अहवालावर जरी सर्व काही अवलंबून असले तरीही संबंधित इमारतीला दोन वर्षांपूर्वीही असेच तडे गेल्याने त्याची डागडुजी करण्यात आली होती
डोंबिवली : येथील नामदेव पथावरील बिल्वदल इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल रविवारीही महापालिकेला उपलब्ध होऊ शकलेला नसल्याने तो प्राप्त झाल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
त्या अहवालावर जरी सर्व काही अवलंबून असले तरीही संबंधित इमारतीला दोन वर्षांपूर्वीही असेच तडे गेल्याने त्याची डागडुजी करण्यात आली होती, मात्र आता तर त्याच्या मुख्य कॉलमलाच तडे गेल्याने तेथे राहणाऱ्या ४८ कुटुंबीयांचा जीव कोणत्याही प्रकारे धोक्यात घालण्यात येणार नसल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. जो अहवाल रविवारी मिळणे अपेक्षित होते तो सोमवारी मिळेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.
रविवारीही या ठिकाणी अग्निशमन विभागासह अन्य आपत्कालीन यंत्रणा तळ ठोकून होत्या. या ठिकाणी कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत होती. या इमारतीबाबत फ विभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी विनायक पांडे यांनी सर्व माहिती घेतली. दोघा अभियंत्यांनी याबाबतचे स्ट्रक्चरल आॅडिट तपासल्याचे सांगण्यात आले. ते कुटुंबीय शनिवारच्याच ठिकाणी महापालिकेच्या आचार्य भिसे शाळेत तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. (प्रतिनिधी)