‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेणार
By admin | Published: December 11, 2015 01:52 AM2015-12-11T01:52:36+5:302015-12-11T01:52:36+5:30
दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. फाउंडेशनचे पाच सदस्य या कुटुंबासाठी खर्च करणार असून, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय पाटील हे त्यांचे मुख्य पालक असतील.
फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार म्हणाले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत न देता, त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही कुटुंबाचे कर्ज फेडणार नसून, कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास फाउंडेशन मदत करेल, जेणेकरून पुन्हा आत्महत्येच्या वाटेला शेतकऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील १२५ कुटुंबांना दत्तक घेतले जाईल. त्यानंतर आणखी १२५ कुटुंबाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे. एकूण १८ महिन्यांत तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत, बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जाईल.’
दुसऱ्या टप्प्यात शेतीशी संबंधित गाय पालन, कुक्कुटपालन असा एखादा जोडधंदा कुटुंबाला सुरू करून दिला जाईल, जेणेकरून पाऊस झाला नाही, तरी कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध असेल, तर तिसऱ्या टप्प्यात शेतीला विकसित करण्यासाठी नियोजित आणि शास्त्रीय पद्धतीसह तंत्रज्ञानाची मदत घेऊन दिली जाईल.
त्यात कमी पाण्यात कोणती चांगली पिके घेता येईल, याची माहिती दिली जाईल. काही खासगी कंपन्या त्यात मदत करतील.
पाच जिल्ह्यांचे पाच पालक
या उपक्रमात पाच जिल्ह्यांचे पालकत्व पाच फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी घेतले आहे. त्यात लातूरचे पालकत्व अभिनेता रितेश देशमुख, परभणीचे पालकत्व कांताराव देशमुख, उस्मानाबादचे पालकत्व शंकरराव बोरकर, बीडचे पालकत्व शिवराम घोडके आणि जालन्याचे पालकत्व कृष्णा अष्टेकर यांनी घेतले आहे. (प्रतिनिधी)