‘त्या’ मच्छीमारांना सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2016 02:56 AM2016-08-06T02:56:12+5:302016-08-06T02:56:12+5:30
मच्छीमारांनी समुद्रात हद्दीसंदर्भात कुठलाही वाद न करता मासेमारी करावी.
पालघर : समुद्रातील मासेमारी धोरण निश्चित होण्यासंदर्भात शासन पातळीवरून प्रयत्न सुरु असून उत्तन, वसई, पालघर, डहाणू आदी भागातील मच्छीमारांनी समुद्रात हद्दीसंदर्भात कुठलाही वाद न करता मासेमारी करावी. जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला कठोर भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसेल, असा सज्जड दम जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बुधवारी मच्छीमारांच्या बैठकीत दिला.
वसई, पालघर, उत्तनच्या मच्छीमारांमध्ये समुद्रातील मासेमारी हद्दीवरून मागील चाळीस वर्षांपासून वाद असून आतापर्यंत अनेक वेळा प्रशासकीय पातळीवरून बैठका झाल्या आहेत. मात्र आजही या वादासंदर्भात यशस्वी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे समुद्रातील हा संघर्ष कायम आहे. या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित आणि आ.हितेंद्र ठाकूर प्रयत्नशील आहेत. पालघर जिल्हाधिकारी बांगर यांनी बुधवारी सर्व मच्छीमार प्रतिनिधींची बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित केली होती. या वेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी बांगर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर,अप्पर पोलीस अधीक्षक बी. यशोद,सहायक मत्स्य व्यवसाय उपायुक्त रवींद्र वायडा, संजय पाटील,पो.नि.सुदाम शिंदे इत्यादीसह मच्छीमार नेते राजन मेहेर,अशोक अंभीरे,सुभाष तामोरे, अनिल चौधरी, सुरेश म्हात्रे, लिओ कोलासो, अशोक नाईक, रवींद्र म्हात्रे, धनंजय मेहेर यासह जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अनेक मच्छीमारांनी आपापल्या बाजू मांडल्या. केंद्र शासनाने राज्य शासनाला समुद्रातील मच्छीमारीसंदर्भातील कायदे बनविण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात मी स्वत: सचिव, मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्याशी विचारविनिमय करीत असून मच्छीमारीसंदर्भातील समुद्रातील कायदे, धोरण निश्चित व्हावे, यासाठी पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे धोरण निश्चित होण्याअगोदर सामंजस्याने समुद्रात मासेमारी करावी, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायद्याच्या भाषेतच उत्तर दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना खडसावून सांगितले. (प्रतिनिधी)
>मच्छीमार नेत्यांची खडाजंगी
प्रत्येक मच्छीमारांनी आपापल्या गावसमोरील समुद्रातील भागातच मच्छीमारी करावी असा पायंडा आहे. त्यानुसारच मच्छीमारी केली जात होती. मात्र उत्तन, वसइच्या मच्छीमारांनी रीतिरिवाजाला मूठमाती देत थेट गुजरातच्या जाफराबाद समुद्रात कवी (खुंट) रोवल्याने सातपाटी, डहाणूच्या मच्छीमारांची गोची झाल्याचे सांगितले.
कायद्यान्वये सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, मात्र समुद्रात मच्छीमारीसंदर्भात कायदे नसल्याचा फायदा उचलत उत्तन, वसईतील मच्छीमार आमचा हक्क हिरावून घेत आहेत. त्यामुळे समुद्रातील ४२.५ नॉटिकल क्षेत्रातीलच्या भागातील कवी दोन महिन्यासाठी उत्तन, वसईतील मच्छीमारांनी बुडवून ठेवाव्यात आणि ते क्षेत्र पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांसाठी मोकळे ठेवावे, असे सुभाष तामोरे यांनी सभेत सांगितले.
या वादामधून लवकरच सुवर्णमध्य गाठता यावा, यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे अशोक अंभीरे यांनी सुचवले. तर उत्तनमध्ये समाजातील काही प्रतिष्ठित लोकांची गावकी संस्था आहे. मात्र बुधवारच्या बैठकीत सातपाटी,डहाणू भागातील मच्छीमारांसह प्रशासनाने सुचवलेल्या गोष्टी आमच्यातील तरुणवर्ग मानत नसल्याचे सांगून उत्तन भागातून अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे लिओ कोल्यासो यांनी हतबलता व्यक्त केली.