‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर हातोडा
By admin | Published: October 8, 2016 03:16 AM2016-10-08T03:16:24+5:302016-10-08T03:16:24+5:30
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम करताना आड येणारी सर्व बेकायदा बांधकामे तोडली होती.
अंबरनाथ : कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम करताना आड येणारी सर्व बेकायदा बांधकामे तोडली होती. त्यातील काही व्यापाऱ्यांनी संगनमत करून महात्मा गांधी विद्यालयाला दिलेल्या जागेवर बेकायदा गाळे उभारले. या प्रकरणी तक्रारी केल्यावर या गाळेधारकांनी आघाडी सरकारमधील तत्कालीन महसूलमंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळवला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यावर महसूलमंत्र्यांनी या प्रकरणी सुनावणी घेत आधीचा स्थगिती आदेश रद्द केला.
त्यामुळे आता या सर्व बेकायदा गाळ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण-बदलापूर महामार्गाला लागूनच महात्मा गांधी विद्यालय आणि या शाळेला शैक्षणिक उपक्रमासाठी जागा दिली आहे. या जागेवर शाळेकडून कोणताच वापर होत नसल्याने ती पडीक आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य महामार्गाचे काम सुरू असताना याच जागेला लागून असलेल्या बेकायदा व्यापारी गाळ्यांवर कारवाई निश्चित मानली जात होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी कारवाई होण्याआधीच दुकाने तोडली.
मात्र, त्यानंतर लागलीच याच दुकानांच्या मागील बाजूला असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा गाळे उभारले. या कामाला महात्मा गांधी विद्यालयाच्या तत्कालीन संस्थाचालकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यात आर्थिक व्यवहारही झाला होता. या प्रकरणी शाळा कोणतीच भूमिका घेत नसल्याने शौकत शेख यांनी बेकायदा गाळ्यांप्रकरणी तक्रार दाखल केली.
मात्र, या व्यापाऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे दाद मागत या कारवाईला स्थगिती आदेश आणला. मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने तीन महिन्यांत शेख यांची तक्रार निकाली काढण्याचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)
महसूलमंत्र्यांकडून आदेश रद्द
महसूलमंत्र्यांनी या प्रकरणी व्यापारी, तक्रारदार आणि तहसीलदारांना बाजू मांडण्यास सांगितले. या सर्वांचे अवलोकन केल्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीचा स्थगिती आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता या बेकायदा गाळ्यांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.