‘त्या’ चार न्यायाधीशांना अंतरिम जामीन
By admin | Published: April 11, 2016 03:10 AM2016-04-11T03:10:20+5:302016-04-11T03:10:20+5:30
न्यायाधीश अनुप जवळकार आत्महत्या प्रकरणातील चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला
अमरावती : न्यायाधीश अनुप जवळकार आत्महत्या प्रकरणातील चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. न्यायाधीशांच्या अटकपूर्व जामिनावर १८ एप्रिल रोजी अमरावती न्यायालयात सुनावणी होणार आहे.
न्या. जवळकार यांनी चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड रेल्वे चौकीजवळ आत्महत्या केली. पोलिसांनी अनुप जवळकार यांचे बंधू अमोल जवळकार यांच्या तक्रारीवरून चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
शुक्रवारी चार न्यायाधीश व एका प्राधिकरण सदस्याने अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एस.एस. दास यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. यावरून न्यायालयाने त्यांचा १८ एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
नातेवाइकांचे जबाब नोंदविले
चांदूररेल्वे पोलीस सावंगा (विठोबा) यात्रेतील बंदोबस्तावर होते. त्यामुळे दोन दिवस न्यायाधीश आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीला वेग मिळाला नव्हता. मात्र, रविवारी चांदूररेल्वेचे पोलीस निरीक्षक गिरीश बोबडे यांच्यासह पोलीस अधिकारी वर्धेत पोहोचले. त्यांनी अनुप जवळकार यांच्या पत्नीसह अन्य काही नातेवाइकांचे जबाब नोंदविले.