‘त्या’ बहिणींवर आभाळमाया !

By Admin | Published: August 18, 2016 06:15 PM2016-08-18T18:15:51+5:302016-08-18T18:15:51+5:30

माणुसकी संपली.. लोप पावली.. असे शब्द वारंवार कानावर येतात. मात्र, हे पुर्णत: सत्य नाही, याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने घालून दिला.

'Those' sisters! | ‘त्या’ बहिणींवर आभाळमाया !

‘त्या’ बहिणींवर आभाळमाया !

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 18 : माणुसकी संपली.. लोप पावली.. असे शब्द वारंवार कानावर येतात. मात्र, हे पुर्णत: सत्य नाही, याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने घालून दिला. आई-वडिलांविना पोरक्या असलेल्या दोन बहिणींचा संघर्ष ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर या बहिणींसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले आणि अवघ्या काही दिवसांत तब्बल सव्वानऊ लाख रुपये जमा झाले. आता त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी या बहिणींना घर बांधून देण्याचे रक्षाबंधनादिवशी जाहीर केले.

गोवर्धनवाडी येथील निकिता आणि पूजा या बहिणी आई-वडिलाच्या मृत्यूनंतर दोघीच एकत्रित राहतात. घरखर्च तसेच शिक्षण घेण्यासाठी आठवड्यातील काही दिवस मोठी बहीण निकिता मजुरीवर जात होती. या बहिणींचा हा संघर्ष ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे आले. ढोकी, उस्मानाबाद एवढेच नव्हे तर पुणे, मुंबई, सोलापूर, जळगाव, दौंड, तासगावसह अनेकांनी या बहिणींना सर्वतोपरी मदत दिली. या बहिणींची ही व्यथा माहिती झाल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी निकिता आणि पूजा यांची भेट घेऊन १ लाखांची मुदतठेव त्यांच्या नावे केली.

याबरोबरच प्रकाश महाजन (औरंगाबाद), आ. विक्रम काळे, भाई उध्दवराव पाटील शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्था, ढोकीचे सपोनि किशोर मानभाव, सोलापूर येथील महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू नानवरे, सेवानिवृत्त सपोनि दिगंबर मैंदाड, चंद्रकांत देशमुख, माणिक माळी, सरपंच बाळासाहेब देशमुख (पाटोदा), अनिकेत लोहिया (अंबाजोगाई), होळणा नदी पुनरूज्जीवन समितीचे अध्यक्ष गोविंद जामदार, मुंबई येथील प्रा. गजानन शेजवळ, पुणे येथील जितेंद्र बोरा, शिवानंद साखरे, ढोकी येथील संग्राम देशमुख, किसन तात्या समुद्रे फौंडेशन, हरिदास फेरे, डॉ. क्रांती गायकवाड, समीर पठाण, नवनाथ गाढवे आदींनीही या बहिणींचे घर सावरण्यासाठी पुढाकार घेतला. ‘लोकमत’ने सदर बहिणींचे वृत्त प्रसिध्द केले तेव्हा या बहिणी स्टोव्हवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र होते. हे पाहिल्यानंतर ढोकी येथील वंदना भारत गॅस एजन्सीच्या जोतीबा धाकपाडे यांनी या बहिणींना सिलिंडरसह गॅस कनेक्शन दिले.

एवढेच काय निकिता ज्या शाळेत शिकते तेरणा साखर कारखाना प्रशालेतील शिक्षकांनी दर महिन्याला वर्गणी गोळा करून निकिताला चार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला तर याच प्रशालेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळालेली रक्कम साठवून निकिताला आर्थिक मदत केली. पाहतापाहता अवघ्या काही दिवसांत तब्बल सव्वानऊ लाखांची मदत या बहिणींच्या खात्यावर जमा झाली.

वळेकर यांनी दिली घरासाठी जागा
‘लोकमत’मधून या बहिणींचा संघर्ष पुढे आल्यानंतर मूळचे गोवर्धनवाडी येथील असलेल्या नानासाहेब भागवत वळेकर यांनी गोवर्धनवाडीतील त्यांच्या राहत्या घराची जागा गोवर्धनवाडीचे सरपंच विनोद थोडसरे यांच्या माध्यमातून या बहिणींच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. वळेकर हे दौंड येथे स्थाईक असून, त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. वळेकर यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी आईचा मृत्यू झाला. त्यामुळे वळेकरांचा सांभाळ दौंड येथील आजी व आत्यानेच केला. तेथेच मोठे झाल्यानंतर ते आजीचा भाजी व्यवसाय सांभाळत आहेत. निकिता आणि पूजा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर या बहिणी ज्या दु:ख भोगत आहेत, तेच दु:ख भोगलेल्या वळेकर यांनी आपल्या राहत्या घराची जागा या बहिणींच्या नावे लिहून दिली. आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी याच जागेवर घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

‘त्या’ बहिणींच्या मागे महाराष्ट्र उभा - मुंढे
‘लोकमत’ने निकिता आणि पूजा या बहिणींचा संघर्ष महाराष्ट्रासमोर आणला. या दोघी मूळच्या आमच्या केज तालुक्यातील. या बहिणींच्या मदतीसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी पुढाकार घेतला. विदारक परिस्थिती असतानाही त्याच्याशी दोनहात करीत या बहिणी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी गोवर्धनवाडीतील त्यांच्या जागेवर घर बांधून देण्याचा निर्णय मी घेतला आहे. येत्या आठवडाभरात या घराचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, असेही विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 'Those' sisters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.