सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच!

By admin | Published: September 10, 2016 04:58 AM2016-09-10T04:58:45+5:302016-09-10T04:58:45+5:30

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सनातनच्या देवद आश्रमावर विशेष तपास पथकाने छापा टाकत औषधांचा साठा जप्त केला

Those substances found in Sanatan ashram are medicines! | सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच!

सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच!

Next


मुंबई : गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सनातनच्या देवद आश्रमावर विशेष तपास पथकाने छापा टाकत औषधांचा साठा जप्त केला. मात्र त्याऐवजी पोलिसांकडून अमलीपदार्थ जप्त केल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वर्तक म्हणाले की, सनातनला बदनाम करण्यासाठी एसआयटीकडून बिनबुडाचे आरोप होत आहेत. याआधीही सीबीआयने कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आश्रमाची तपासणी केली आहे; शिवाय येथील साधकांचीही चौकशी झाली आहे. त्याचा सर्व अहवाल सीबीआयकडून मिळू शकत असतानाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एसआयटीने उत्सवाच्या काळात छापा टाकला. शिवाय पहाटे साडेचार वाजेपर्यंत म्हणजेच १६ तास चौकशीत गुंतवून साधकांचा मानसिक छळ केला.
महत्त्वाची बाब म्हणजे एसआयटीला या छाप्यात काहीही मिळाले नसल्याचा सनातनचा दावा आहे. तरीही आश्रमातील दवाखान्यातील नि:शुल्क औषधे जप्त करून एसआयटीने अमलीपदार्थांचा साठा जप्त केल्याचा कांगावा केला आहे. मुळात आश्रमातील साधकांच्या उपचारासाठी २० ते ३० वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव असणारे मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ डॉक्टर येथील दवाखाना चालवतात. दवाखान्यात लागणारी औषधे ही सर्व अधिकृत बिलांसह घेतली जातात. ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४०’नुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधांचा साठा आणि वितरणासाठी लागणाऱ्या परवान्यात पूर्णत: सवलत दिलेली आहे. तरीही औषधे जप्त करून त्याचा पंचनामा पोलिसांनी काही माध्यमांना बेकायदेशीररीत्या देऊन सनातनची बदनामी करण्याचा प्रयत्न केला
आहे. (प्रतिनिधी)
>हिंदुत्ववादी
सरकार निरुपयोगी
राज्यात हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार असतानाही सनातन संस्थेचा विनाकारण छळ होत असल्याने वर्तक यांनी खंत व्यक्त केली. सरकारसमोर संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. त्यामुळे कार्यवाही न करणारे सरकार निरुपयोगी असल्याचे सनातनने सांगितले.

Web Title: Those substances found in Sanatan ashram are medicines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.