'त्या' आदिवासी तरुणींचा खळबळजनक खुलासा
By admin | Published: January 30, 2017 07:11 PM2017-01-30T19:11:17+5:302017-01-30T19:11:17+5:30
दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - कांकेर (छत्तीसगड) येथील संबंधित दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही, असा खळबळजनक खुलासा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. सैनू व शीला गोटा या दाम्पत्याने खोटे बोलायला लावले होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. परिणामी न्यायालयाने दोन्ही तरुणींना त्यांच्या भाऊ व काकाच्या स्वाधीन करून हवे तेथे जाण्याची मुभा दिली आणि पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास मनाई केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला खुल्या न्यायालयात प्रकरण ऐकण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणींचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता इन चेंबर सुनावणी घेण्यात आली. तरुणींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तरुणींना हिंदी, मराठी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या बोली भाषेमध्ये पोलिसांनी अत्याचार केला नाही, गोटा दाम्पत्याने आम्हाला खोटे बोलायला लावले असे सांगितले. वकिलाने ही माहिती इंग्रजीमध्ये न्यायालयाला दिली. दोन्ही तरुणी सुरक्षित असल्याने व त्यांनी केलेल्या खुलाशामुळे प्रकरणातील मूळ मुद्दे नष्ट होऊन संबंधित दोन्ही याचिका निरर्थक ठरल्या. परिणामी याचिका निकाली काढण्यात आल्या. अॅड. निहालसिंग राठोड यांनी तरुणींना न्यायालयात हजर करण्यासाठी तर, तरुणींच्या एका नातेवाईकाने दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी याचिका दाखल केली होती.
गडचिरोली पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने गेल्या शनिवारी तरुणींसह गोटा दाम्पत्याला अॅड. राठोड यांच्या कार्यालयातून वादग्रस्तरीत्या ताब्यात घेतले होते. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता रविवारी सुटीच्या दिवशी अॅड. राठोड यांची याचिका ऐकून तरुणींना शासकीय सुधारगृहात ठेवण्याचा आणि पोलिसांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता. याचिकाकर्त्यांतर्फे मुंबईतील वरिष्ठ वकील गायत्री सिंग व अॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे अॅड. शिशिर उके यांनी कामकाज पाहिले.
-----------------------
असे आहे प्रकरण
गडचिरोली जिल्ह्यतील हिदूर (एटापल्ली) जंगलात २० जानेवारी रोजी रात्री पोलीस व नक्षलींची चकमक उडाली होती. दरम्यान, पोलिसांना या परिसरात संबंधित तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्या रात्री जंगलातच आश्रय घेतला. त्यावेळी पोलिसांनी तरुणींवर अत्याचार केला, असा गोटा दाम्पत्याचा आरोप होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यांनी २३ जानेवारी रोजी दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली. त्यात अत्याचार झाल्याचे आढळले नाही. पोलीस गोटा दाम्पत्यावर पाळत ठेवून होते. ते तरुणींसह अॅड. राठोड यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती खबऱ्याने देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.