‘त्या’ सयामी जुळ्यांचा दुर्देवी अंत
By admin | Published: June 20, 2016 08:49 PM2016-06-20T20:49:04+5:302016-06-20T20:49:04+5:30
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पहिल्यांदाच जन्मलेल्या सयामी जुळ्यांचा मुंबईला नेत असताना वाटेतच रविवारी मध्यरात्री दुर्देवी अंत झाला़.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २० - लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पहिल्यांदाच जन्मलेल्या सयामी जुळ्यांचा मुंबईला नेत असताना वाटेतच रविवारी मध्यरात्री दुर्देवी अंत झाला़.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथील तसलीम अहेमद मासूलदार ही महिला शनिवारी दुपारी बाळंत झाली़ तिला हृदय आणि यकृत एक असलेले व छाती आणि पोट एकमेकांना चिकटलेले दोन जुळे झाले़ सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ़ शिवप्रसाद मुंदडा यांनी मुंबईच्या सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ़ प्रसन्न कोठारी यांच्याशी चर्चा केली़. मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉ़ कोठारी यांनी या सयामी जुळ्यांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू तयार केला आणि सयामी जुळ्यांसाठी एक खाट आरक्षित ठेवले़. मुंबईतील डॉक्टरांच्या सूचनेनुसार रविवारी दुपारी कार्डीयाक रुग्णवाहिकेसह दोन बालरोग तज्ज्ञ, दोन परिचारक व एक सहाय्यक असा पाच जणांचा चमू सयामी जुळ्यांना घेऊन मुंबईकडे निघाला़ हा चमू मध्यरात्री पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयानजीक असताना सयामी जुळ्यांचे ठोके कमी होत असल्याचे जाणवू लागले़. त्यामुळे डॉक्टरांनी सयामींना भारती विद्यापीठाच्या रूग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले़ दुर्देवाने सयामी जुळ्यांचे हृदय बंद पडून हलचाल थांबली़ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली़. परंतु, त्यास यश आले नाही़ त्यामुळे हतबल झालेल्या डॉक्टरांनी पुन्हा लातूरकडे आपले वाहन वळविले़. हे सर्वजण सोमवारी सकाळी लातुरात पोहोचले़ खिन्न भावनेने डॉक्टरांनी सयामी जुळ्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले़. नातेवाईकांनी आपल्या मुळ गावी पेठसांगवी (ता़ उमरगा) येथे नेऊन शोकाकूल वातावरणात दफनविधी करण्यात आला़.
सेवा मोफत...
मासूलदार यांची परिस्थिती नाजूक असल्याने लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांनी जुळ्यांना मुंबईला नेण्यासाठी डॉक्टरांच्या चमूसह अत्याधुनिक सुविधेची कार्डियाक रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करुन दिली़ मुंबईतील सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितल्याने त्यांनीही तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू तयार केला होता़ परंतु, रस्त्यातच जुळ्यांचा अंत झाला़ त्यामुळे आम्हीही गहिवरलो, अशी भावना डॉ़ शिवप्रसाद मुंदडा यांनी व्यक्त केली़
मातेनेच पाहिले नाही...
तसलीम मासूलदार यांना जुळे असल्याने त्यांच्यावर प्रसूतीपूर्व शस्त्रक्रिया करण्यात आली होती़ सयामी जुळे जन्मल्यानंतर दोन्ही नवजात बाळांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नव शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ त्यामुळे मातेला आपल्या बाळांना पाहताही आले नाही अन् मायेने दूध पाजताही आले नाही़ त्यामुळे मातेचा अश्रूंचा बांध फुटला होता़