‘त्या’ टोळक्याकडे होती प्राणघातक शस्त्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 03:29 AM2016-11-05T03:29:33+5:302016-11-05T03:29:33+5:30
आरोपींकडून दोन बॅरलची फोल्ड केलेली बंदूक, चार जीवंत काडतुसे, ६ कोयते, चॉपर, एक लोखंड फारशी, डिसमिस, पिकअप जीप, ५,७०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त
मनोर / पालघर : गेल्या महिन्यामध्ये बहिरीपोन्डा गावाच्या हद्दीत मनोर पोलिसांनी सापळा रचून पकडलेले आरोपींकडून दोन बॅरलची फोल्ड केलेली बंदूक, चार जीवंत काडतुसे, एक पीस्टल रिवॉल्व्हर, ६ कोयते, चॉपर, लाल रंगाची बॅटरी, एक मोटर सायकल, एक लोखंड फारशी, डिसमिस, पिकअप जीप, ५,७०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मनोर पोलीसांनी दिली. दरम्यान, टायगर (नरेश), जयराम, मायकल मरोटीम हे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा ही शोध सुरु आहे.
स. पो. नि. मनोज चाळके यांनी पत्रकार परिषद माहिती दिली की, पोलीस पाटील चंदू भुयाल यांनी दि १६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या माहिती नुसार मनोर पोलिसांच्या दोन तुकड्या तयार करून बहिरपोन्डा जायसेतच्या जंगलामध्ये जाऊन सापळा रचून अनुज कुमार कमलेश्वर प्रसाद (२६) रा. त्रिवेदी नगर बोईसर, नरेश उर्फ खाटा लखमा दळवी (२४) रा. उद्धवा दळविपाडा तलासरी व साईनाथ गोविंद वड (२१) रा. जायसेत बहिरपोन्डा तालुका पालघर यांना पकडले होते. त्यांच्या जवळ असलेली बॅगेमध्ये असलेले शस्त्र व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
आरोपीना पकडण्यासाठी स. पो. नि. मनोज चाळके, पो. उ. नि. अक्षय सोनवणे , डी. ओ. सोनवणे, पी. बी. पाटील, पो. हा. भांगरे, सुतकर, बोन्ड, पवार, कणसे, गाडेकर, गवळी भाये, सूर्यवंशी, वाघ, इतर पोलिसांच्या दोन तुकड्या करून त्यांना पकडण्यास यश आले. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजी. न. ५/२०१६ शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ (१) २५ भा द वी ३४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. दादरा-नगर हवेली , गुजरात, महाराष्ट्र असे तिन्ही राज्यात रॉबरी, दरोडे, लूटमार, चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
चाळके यांनी मनोर पोलीस ठाण्याचे अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचयतींना गावात किंवा परिसरात जंगलात कोणी अनोळखी व्यक्ती दिसला तर पोलिसांना कळवा असे लेखी पत्र देऊन आधीच कळवले असल्याची माहिती दिली.
तसेच पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांनाही या विषया संदर्भात कल्पना दिली होती. म्हणून त्यानुसार जायसेत बहिरपोन्डा पोलीस पाटील चंदू भयाल यांनी तिघांची माहिती पोलिसांना दिली होती. (वार्ताहर)
>मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिकअप जीप चोरीस गेली होती. तसेच महामार्गावर एका ट्रॅक धारकाला लुटले होते.
मोटरसायकल चोरी असे तीन गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे. तसेच पालघर व ठाणे जिल्हयात आणखीन इतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे, असे चाळके यांनी सांगितले.