"जे भाजपमध्ये जातात, त्यांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपविले जाते", रोहित पवारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:34 PM2023-12-05T12:34:11+5:302023-12-05T12:35:21+5:30
सध्या पुणे ते नागपूर असा प्रवास करणारी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात आहे.
अमरावती : युवा संघर्ष यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज अमरावतीत दाखल झाले आहे. यावेळी रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, भाजपसोबत गेलेल्या शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला एक दक्षतेचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, सध्या पुणे ते नागपूर असा प्रवास करणारी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात आहे.
या यात्रेदरम्यान अमरावतीमधील फुबगावमध्ये रोहित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच, रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जी परिस्थिती भाजपने शिवसेनेची केली. तशीच परिस्थिती शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा मित्रमंडळाची होईल, अशी चर्चा सध्या जनतेमध्ये आहे. तेव्हा याची दक्षता सगळ्यांनी घेणे गरजेचे आहे. भाजपला लोकनेते चालत नाहीत. भाजपला असे पक्ष चालत नाहीत की, ते लोकांमधील पक्ष आहेत. जे कुठले पक्ष किंवा लोकनेते भाजपमध्ये जातात, त्यांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपविले जाते, असा आरोप रोहित पवार यांनी भाजपवर केला आहे.
२०१४ नंतर राज्यातील राजकारणात बऱ्याच काही गोष्टी बदलल्या आहेत. भाजपने हळूहळू शिवसेनेची ताकद कमी केली. मुंबई महानगर पालिकेतही तेच दिसून आले. तर राज्यात आमदारांची संख्या उलटी झाली. शिवसेनेचे आमदार कमी झाले तर भाजपचे वाढले. कारण, भाजपने शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी हळूहळू अपक्ष आमदार उभं करणे असेल, नाही तर शिवसेनेचे आमदार पाडणो असेल या सगळ्या खेळी भाजपकडून खेळण्यात आल्या. मात्र यातून शिवसेना शहाणी झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन वेगळं एक समिकरण आपल्या समोर मांडले. ते जनेतेने स्वीकारलेही मात्र, भाजपने खेळी करत सरकार पाडले, असे रोहित पवार म्हणाले.