ज्यांनी ज्यांनी दिली साथ, त्यांच्यावर विश्वास! बंडात सोबत असलेल्यांना एकनाथ शिंदेंकडून संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:38 PM2024-10-24T14:38:21+5:302024-10-24T14:39:18+5:30

शिंदेसेनेने पहिल्या यादीत तीन महिलांना स्थान दिले आहे.

Those who supported, believe in them! Opportunity from Eknath Shinde to those who are with the rebellion | ज्यांनी ज्यांनी दिली साथ, त्यांच्यावर विश्वास! बंडात सोबत असलेल्यांना एकनाथ शिंदेंकडून संधी

ज्यांनी ज्यांनी दिली साथ, त्यांच्यावर विश्वास! बंडात सोबत असलेल्यांना एकनाथ शिंदेंकडून संधी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिंदेसेनेची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा समावेश आहे. ज्यांनी साथ दिली त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी उमेदवारी दिली आहे. आता शिंदेसेनेला महायुतीत आणखी किती जागा सुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. शिंदेसेनेने पहिल्या यादीत तीन महिलांना स्थान दिले आहे.

अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच बड्या प्रमुख नेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. नेत्यांसोबत ज्यांनी साथ दिली त्यांच्या कुटुंबीयांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोलीतून, लोकसभेवर निवडून गेलेले संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठणमधून उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूरमधून, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित  अडसूळ यांना दर्यापूरमधून उमेदवारी दिली आहे.

तीन लाडक्या बहिणींचा समावेश

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येतो. शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत तीन महिला उमेदवारांचा समावेश आहे. साक्रीतून मंजुळा गावित तर  मुंबईतील जोगेश्वरी पूर्वमधून खा. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भायखळा येथून लोकसभेत पराभूत झालेल्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यावर पुन्हा विश्वास टाकण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी भरणार अर्ज

गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु, राज्यातील इतर उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शिंदे राज्यभर दौऱ्यावर असल्याने आता ते उमेदवारी अर्ज सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. सोमवारी वसूबारस असल्याने शुभ मुहूर्त आहे. शिंदे हे बुधवारी सहकुटुंब गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परत येताच त्यांनी आपला गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय बदलला हे विशेष.

सख्ख्या भावांना उमेदवारी

भाजपने आशिष आणि विनोद शेलार या सख्ख्या बंधूंना उमेदवारी दिली आहे. हाच पॅटर्न शिंदेसेनेतही वापरण्यात आला आहे. रत्नागिरीतून मंत्री उदय सामंत व राजापूरमधून त्यांचे बंधू किरण सामंत रिंगणात आहेत. नीलेश राणेंनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे, त्यांना कुडाळमधून उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे नीलेश आणि नितेश यांच्या रूपाने तिसरी सख्ख्या भावांची जोडी दिसणार आहे.

चार विद्यमान आमदार वेटिंगवर

शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत चार विद्यमान आमदारांची नावे नाहीत. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर, भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे आणि पालघरचे श्रीनिवास वनगा या चौघांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. बालाजी किणीकर हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. 

Web Title: Those who supported, believe in them! Opportunity from Eknath Shinde to those who are with the rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.