ज्यांनी हर हर महादेव सिनेमाला समर्थन दिले ते महाराष्ट्रद्रोही; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 08:23 PM2022-11-18T20:23:30+5:302022-11-18T20:24:13+5:30

बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज बाहेर आले आणि ओरडणारे बिळात गेले अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

Those who supported Har Har Mahadev movie are Maharashtra traitors; Attack of Jitendra Awhad | ज्यांनी हर हर महादेव सिनेमाला समर्थन दिले ते महाराष्ट्रद्रोही; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

ज्यांनी हर हर महादेव सिनेमाला समर्थन दिले ते महाराष्ट्रद्रोही; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

googlenewsNext

ठाणे - हर हर महादेव चित्रपट लोकांनी स्वत:हून महाराष्ट्रातून बाहेर फेकून दिला. कोण कुत्रं सुद्धा हा चित्रपट बघायला तयार नाही. पण, दुर्देव हे आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट गेला आहे. त्या भाषांतून हा वेगळा इतिहास वेगवेगळ्या राज्यांत जाणार आहे. तो कसा थांबवायचा याचाही महाराष्ट्रातील लोकांनी विचार करायला हवा. मी हे सत्य बाहेर आणलं, त्याबद्दल बोललो याबद्दल माझ्या मनाला प्रचंड सुख आणि आनंद आहे. माझ्यावर पोलीसांनी राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे नोंदवले याची मला अजिबात खेद ना खंत; असे गुन्हे नोंदवलेच जातात. पण दुर्देवाने पोलीस ह्यामध्ये भरडले जातात याचे वाईट वाटते. ज्यांनी ज्यांनी ह्या चित्रपटाला समर्थन दिले ते-ते महाराष्ट्र द्रोही आहेत आणि त्यांनी राज्याची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘हर हर महादेव’ ह्या चित्रपटाबद्दल मी माझे मत मांडले. ते मत मी अत्यंत स्पष्टपणाने आणि इतिहासाचे दाखले देत मांडले होते. ते मांडत असताना प्रत्येक प्रसंगाचे वर्णनही केले होते आणि त्याची तुलनाही केली होती. हास्यास्पद गोष्ट अशी होती, की छत्रपती शिवाजी महाजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाची. कृष्णा भास्कर कुलकर्णीला लपविण्यासाठी शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवतारात दाखवणं हे अत्यंत मूर्खपणाचं लक्षण होतं. पोलिसांनी त्यातही माझ्यावर गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदविणाऱ्याने स्पष्टपणाने सांगितले, की जितेंद्र आव्हाड यांचा यामध्ये काहीही दोष नाही. त्यांनी मला काहीच केलेले नाही, किंबहुना तेच मला बाहेर घेऊन आले. पण तरीही पोलीसांनी ओढून ताणून नको ते कलम लावून माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवून मला अटक करुन एक दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत जे जे मुद्दे मी उचलले होते, त्या मुद्द्यांबद्दल मी ठाम होतो आणि त्याचा खुलासा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच केला आहे. या चित्रपटामधील प्रसंगांना कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. हे सर्व कल्पोकल्पित आहे आणि आमच्या भावना दुखावणारे आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणारे आहे. अत्यंत मुश्किलीने दादोजी कोंडदेव, कुलकर्णी यांचं भूत इतिहासाच्या डोक्यावरुन उतरवल गेलयं. म्हणून एका नवीन वर्णवर्चस्ववादी, जातवर्चस्ववादी डोक्यातून बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बिनीचे शिलेदार होते त्यांनाच महाराजां पुढे उभं करण्याची घाई ह्या लोकांना लागली होती. झटपट 3-4 चित्रपट आणायचे आणि एक नवीन इतिहास तरुण पिढीच्या डोक्यात घुसवायचा ही घाई त्यांना लागली होती असंही आव्हाड म्हणाले. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य मानवजातीतल पुरुष होते. ते असामान्य होते याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आमचं स्पष्ट मत कालही होतं, आजही आहे. पण, कृपया त्यांना दैवत्व देऊ नका. त्यांची कृती ही इतिहासात एका राजाने प्रजेसाठी काय काय करावे, कसे कसे करावे हे अतुलनीय कर्तृत्व जगाच्या अंतापर्यंत शिल्लक राहील. ह्या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर ब-याच जणांनी तोंड उघडलं. पण, आतामात्र त्यांना बोलायलाही तोंड नाही. जेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज बाहेर आले त्यानंतर जे सत्य बाहेर आलं त्यानंतर खरतरं ह्या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांचे समर्थन करणारे ह्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचं दु:ख मनी ठेवून महाराष्ट्राची माफी मागायला हवी होती. पण, तसे ते करण्याची क्षमता कमी आहे असा टोला आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे मनसेला लगावला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Those who supported Har Har Mahadev movie are Maharashtra traitors; Attack of Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.