मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 11:27 AM2023-12-09T11:27:01+5:302023-12-09T11:28:18+5:30
देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
मुंबई - तुमच्या सभागृहात आणि संसदेत असे लोक तुम्ही पक्षात घेतलेत ज्यांच्यावर नवाब मलिकांपेक्षा भयंकर गुन्ह्यांची नोंद आहे. आर्थिक फसवणूक ही एकप्रकारे आर्थिक दहशतवाद आहे.हे पंतप्रधान नेहमी सांगतात.आमच्या पक्षाचे खासदार, राष्ट्रवादीचे खासदार तुम्ही सोबत घेतले त्यांच्यावर आरोप आहेत. तुम्हाला त्यांच्यापासून काही त्रास नाही.प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. जेव्हा ते केंद्रात मंत्री होते तेव्हा भाजपानेच आरोप केले होते अशी आठवण करत संजय राऊतांनीभाजपावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, पटेल यांचे दाऊद आणि इक्बाल मिर्ची यांच्यासोबत आर्थिक व्यवहार आहेत असं म्हटलं होते. आज प्रफुल पटेल कोणासोबत आहेत? नवाब मलिकांना तुम्ही टार्गेट करताय मग प्रफुल पटेल चालतात? तुम्ही कायद्याची, नैतिकतेची भाषा करता, देशभक्तीबाबत बोलता मग देशभक्तीची व्याख्या नवाब मलिकांना वेगळी आणि प्रफुल पटेल यांना वेगळी आहे का? भावना गवळी, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक यांच्यासाठी वेगळी आहे का?असा सवाल संजय राऊतांनी भाजपावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे.
भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट व्हायला हवं
नाशिकमध्ये ड्रग्स रॅकेट समोर आले, पुण्यातून ललित पाटीलला पळवलं या प्रकरणात २ मंत्री सहभागी आहेत. तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली? सरकारच्या मदतीशिवाय ससून रुग्णालयात ९ महिने एक कैदी राहतो आणि तिथून पळून जातो. मंत्र्यांनी मदत केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. तुम्ही काय केले. भाजपाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. यांच्या सरकारमधील बहुतांश मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. नैतिकतेचे फुगे फुगवता पण ही नैतिकता औषधलाही शिल्लक आहे का? भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट व्हायला हवं असा चिमटा संजय राऊतांनी काढला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली. दोघांचे दाऊदशी संबंध दाखवले आहेत. दोघांनी दाऊदच्या हस्तकांसोबत व्यवहार केले आहेत. मग प्रफुल पटेल हे पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.पण नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं फडणवीस म्हणतात.बेईमान, गद्दार लोकांनी ईडीला घाबरून पलायन केले कारण तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. ईडीने अटक करायचे वॉरंट काढलेत ते नवाब मलिकांवर टीका करतायेत असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदे गटालाही लगावला.