"सावरकर गौरव यात्रा नाव असलं तरी, ही अदानी बचाव यात्रा; यांनी ही यात्रा काढणं, सावरकरांची सर्वात मोठी बदनामी"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:34 AM2023-03-28T10:34:27+5:302023-03-28T10:34:45+5:30
ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.
राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने राहुल गांधी यांच्या स्वातंत्रवीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर, राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. यानंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा आहे. यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, काल मुख्यमंत्री वीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा करताना, सावरकरांसंदर्भात दोन वाक्यही उत्स्फुर्तपणे बोलू शकले नाहीत. त्यांच्यासमोर एक कागद होता तो वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.
सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा -
सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा आहे. अदानी प्रकरणावरील, त्यांच्या लुटमारीवरील लक्ष विचलित व्हावे, म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अदानी गौरव यात्रा काढत आहेत. वीर सावरकर हे एक महान देशभक्त होते, एक महान क्रांतीकारक होते, एक महान समाजसुधारक होते. शिवसेनेला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या विषयी कायम आदर आहे. त्यामुळे या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगाचे प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय, असेही राऊत म्हणाले.
यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी -
छत्रपती शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे जे भव्य स्मारक आहे. त्याच्या उभारणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. जाऊन पाहा. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्वीकारले आहे. ते सावरकरांप्रमाणे शेंडी जाणव्याचे हिंदूत्व नसून विज्ञानवादी हिंदूत्व आहे. हे भाजपला मान्य आहे का? सावरकरांची गोमातेवरची भूमिका त्यांना मान्य आहे का? हे ढोंग आहे, ही अदानी बचाव यात्रा आहे. खुर्ची बचाव यात्रा आहे. नाव केवळ सावरकरांचे. यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असा टोलाही राउतांनी नाव न घेता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.