नव्या वर्षात हजार मालवाहतूक ट्रक धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:25 AM2019-01-02T05:25:00+5:302019-01-02T05:25:01+5:30
नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
मुंबई : नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्या संदर्भातील अहवाल या वर्षी सल्लागार कंपनीकडून मांडण्याची खात्रीलायक माहितीही संबंधित अधिकाºयाने दिली. यावर गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून, यंदा तो मूर्त स्वरूपात साकार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
रेल्वेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे रस्ते माल वाहतुकीस सुरुवात करण्याची संकल्पना रावते यांनी मांडली. त्यानुसार, सल्लागार कंपनीकडून या संदर्भात अभ्यास सुरू आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतरच अधिक माहिती देण्यात येईल, असेही रावते यांनी सांगितले. या वर्षी संबंधित अहवाल महामंडळ स्तरावर सादर होण्याची माहिती एका वरिष्ठाने दिली, तसेच महामंडळाच्या संमतीनंतर तत्काळ संबंधित अहवालाला शासन मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनीही या संकल्पनेबाबत सकारात्मक पवित्रा घेतल्याचे संबंधित अधिकाºयाने सांगितले.
दरवर्षी महामंडळातून एक ते दीड हजार एसटी भंगारात जातात. याच भंगारातून संबंधित ट्रकची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. ज्या एसटीचे इंजिन चांगल्या क्षमतेत आहे, त्यांचा वापर पुढील चार ते पाच वर्षांसाठी माल वाहतुकीसाठी करण्याचाही विचार आहे. एकंदरीतच पहिल्या टप्प्यात एक हजार ट्रक तयार करण्याचे विचाराधीन आहे.
या मालवाहतुकीमध्ये कृषी माल शहरी भागात पोहोचवण्यासाठी प्राधान्य देण्याचा महामंडळाचा विचार आहे. अर्थात, बाजारातील इतर माल वाहतूक स्पर्धकांच्या तुलनेत किफायतशीर दरामध्ये ही वाहतूक पुरविली जाईल. मात्र, प्रवासी वाहतुकीप्रमाणे सेवा पुरविण्याचा उद्देश न ठेवता, आर्थिक नफ्याचा उद्देशही समोर ठेवला जाईल. जेणेकरून रेल्वे प्रशासनाप्रमाणेच माल वाहतुकीमधील नफा प्रवासी सेवेतील तूट भरून काढण्याचे काम करेल. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवीन भरती करणार!
प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत माल वाहतुकीमधील नियमांत बरीच तफावत आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी सुमारे एक हजार चालकांची स्वतंत्र भरती करण्यात येणार आहे.
पार्किंगचे नो टेन्शन!
सध्या एसटी महामंडळाकडे असलेल्या जागेमध्ये १९ हजार गाड्या उभ्या केल्या जातात. सुमारे २५ हजार गाड्या सामावून घेण्याइतकी जागा महामंडळाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे नवे एक हजार ट्रक ताफ्यात सामील झाल्यानंतर, त्यांच्या पार्किंगचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.