गोष्ट हजार, पाचशेच्या नोटेची

By admin | Published: November 9, 2016 03:10 AM2016-11-09T03:10:37+5:302016-11-09T03:10:37+5:30

पंतप्रधानांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हजाराच्या नोटेचेची गोष्ट होती.

Thousand thousand, five hundred notes | गोष्ट हजार, पाचशेच्या नोटेची

गोष्ट हजार, पाचशेच्या नोटेची

Next

पुणे : पंतप्रधानांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हजाराच्या नोटेचेची गोष्ट होती. कुटुंब.. एटीएम.. पेट्रोलपंप.. हॉटेल... पादचारी.. व्हॉट्स अ‍ॅपवरील ई -कट्टे यावर केवळ हजारा-पाचशेच्या नोटेचीच चर्चा होती.
नागरिकांच्या दृष्टीने एतिहासिक अशा या निर्णयाची अनपेक्षितपणे मंगळवारी रात्री घोषणा करण्यात आली. याचे साहजिकच सर्वच स्तरात परिणाम दिसून आले. या निर्णयामुळे अनेकांना नक्की काय करावे हे देखील सूचत नसल्याचे चित्र होते. काही जणांनी आपल्याकडील काही नोटा पेट्रोलपंपावर सुट्ट्या करुन घेतल्या. खरेतर एखाद दुसऱ्या हजार-पाचशेच्या नोटेने फारसा काही परिणाम होत नाही, हे सर्वांना चांगलेच माहीत असते. मात्र चलनातून बाद झालेली एखादी तरी नोट कमी झाली, याचे काहीसे समाधान नागरिक मानताना दिसत होते. पेट्रोलपंपावर दुचाकी वाहनांबरोबरच चारचाकी वाहनांची वाहनांनी देखील गर्दी केली होते. तेथे देखील हजाराच्या नोटेमुळेच गर्दी झाल्याची चर्चा होती. अनेकांकडे पेट्रो-डेबिट कार्ड असते. त्याचा वापर पेट्रोल भरण्यासाठी होऊ शकतो हे माहीत असतानाही पेट्रोलपंपावरील अभूतपूर्व गर्दीचे कोडे न उलगडणारेच आहे.
हा निर्णय आल्यानंतर काही जणांनी तर थेट सराफी व्यावसायिकांकडे धाव घेतली. अनेकांनी आपल्याकडी हजार-पाचशेच्या नोटा सोन्यामध्ये गुंतवणुकीची इच्छा दर्शविली होती. शहरातील एका बड्या सराफी व्यावसायिकाने तर सोने खरेदीची करण्यासाठी मला दोनशेहून अधिक फोन आल्याचे सांगितले. तसेच दुकानीदेखील नागरिकांची गर्दी झाल्याची पुस्ती त्यांनी जोडली. विविध एटीएमवर केवळ शंभराच्या नोटा मिळतायेत की नाही याची चाचपणी सुरु होती. एटीएमवरील गर्दी असो की रस्त्यावरील पादाचारी सर्वांच्या तोंडी केवळ याच निर्णयाची चर्चा होती. जो, तो आपल्याला सुचेल त्या पद्धतीनेच हजाराच्या निर्णयावर मार्ग काढताना वा चर्चा करताना दिसत होता. (प्रतिनिधी)


वरचे पैसे नको, व्हाईटमध्येच द्या...
फ्लॅटखरेदीसाठी वरचे पैसे आणि व्हाईट अशा दोन पद्धतीने पैसे दिले जातात. मात्र, हा निर्णय जाहीर झाल्यावर कालच व्यवहार झालेल्या एका ग्राहकाला घरमालकाचा फोन आला. वरचे पैसे नको...सगळे व्हाईटमध्येच द्या...
फ्लॅटखरेदी करताना मुद्रांक शुल्क आणि इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी व्यवहार दोन पध्दतीने केला जातो. साधारणत: शासकीय दराइतका व्यवहार व्हाईटमध्ये होतो आणि त्यापेक्षा जास्तीची रक्कम ब्लॅकमध्ये दिली जाते. एका व्यवहारात सहा लाख रुपयांची रक्कम ब्लॅकने दिली होती. ही रक्कम आता दाखवयाची कशी असा या घरमालकासमोर प्रश्न उभा राहिला. मात्र, ग्राहकानेही ही रक्कम पुन्हा व्हाईटने देण्यासाठी नकार दिला. कारण त्याने इकडून तिकडून जमा केलेली ही रक्कम व्हाईटमध्ये दाखवायची कशी?
अगदी एका व्यवहारातील सहा लाख रुपयांची रक्कम व्हाईटमध्ये आल्यावर त्याचा ३० टक्के दराने १ लाख ८० हजार रुपये इन्कम टॅक्स भरावा लागेल. पुण्यासारख्या शहरात जेथे दररोज हजारो व्यवहार होत असतात, तेथे काळा पैसा किती प्रमाणात तयार होऊ शकतो, याचे एक उदाहरणच.
पुण्यातील एका प्रसिध्द बांधकाम व्यावसाईकाच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांतील मंदीसदृश वातावरणामुळे आता ‘वरचे पैसे’ घेण्याचे प्रमाणच कमी झाले आहे. शिवाय नोकदार मंडळी असल्याने कर्ज काढूनच फ्लॅट घ्यावा लागतो. बॅँकेचे कर्ज मंजूर व्हायचे असेल तर किंमत कमी दाखवून चालत नाही. याशिवाय आता २० हजारांपेक्षा जास्त रकमेचे ट्रान्झॅक्शन होतच नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.


एटीएम केंद्राबरोबरच शहरमध्यवस्तीतील पेट्रोलपंपावरदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. काही जण एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा सुट्ट्या करण्यासाठी आले असल्याचे दिसून येत होते. एटीएम बंद असल्याने रोख रकमेचा तुटवडा जाणवेल या हेतूने, पेट्रोल भरण्यासाठी आले होते. कर्वे रस्त्यावरील एका पंपाचे पेट्रोल लवकर संपले. तर दुसऱ्या दोन्ही पंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. आलिशान चारचाकी वाहन चालविणाऱ्या एकाने तर घरातील तीन वाहने पेट्रोल भरण्यासाठी आणली होती.

सीएंचे फोन बिझी
पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केला आणि शहरातील सीएंचे फोन एंगेज झाले. रोख रकम कशी दाखवायची यासाठी विचारणा होऊ लागली. एका सीएने दिलेल्या माहितीनुसार, फार मोठी कॅश व्हाईट करून घेणे अवघडच आहे. त्यामुळे आता इन्कम टॅक्स स्किमखालीच ही रक्कम दाखवावी लागणार, असेच सीएंनी सांगितले.

केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने हिरव्या रंगाच्या शंभराच्या नोटेला चांगलाच भाव आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हजार-पाचशे रुपयांच्या बंद्या नोटा सुट्ट्या करण्यासाठी, तसेच एटीएममधून फक्त शंभराच्या नोटा काढण्यासाठी नागरिकांची मंगळवारी रात्री शहरातील एटीएम केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली होती.
चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद होणार असल्याचा निर्णय इलेक्ट्रॉनिक माध्यमे, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून अल्पावधीतच पसरला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ९) बँका व एटीएम बंद राहणार असल्याने, पैसे काढण्यासाठी नागरिकांनी विविध बँकांच्या एटीएममध्ये गर्दी केली होती.
शहर मध्यवस्तीतील बहुतांश एटीएम केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी जास्त दिसून येत होती. एटीएम बंद असल्याने रोख नोटांची समस्या जाणवू नये यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यातही अनेकजण चारशे-चारशे अशी रक्कम दोनदा काढताना दिसत होते. काही एटीएमवर शंभराच्या नोटा संपल्याचे दिसून आले. तर काही एटीएममधून केवळ पाचशे-हजाराच्या नोटा येत होत्या.

 

Web Title: Thousand thousand, five hundred notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.