हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

By admin | Published: October 4, 2016 05:24 AM2016-10-04T05:24:51+5:302016-10-04T05:24:51+5:30

आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे

Thousands of angry tribals surrounded the house of Vishnu Sawar | हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

Next

वाडा (पालघर) : आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे.
सवरा यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावून ठोस कृती हवी, अशी ठाम भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सवरा हे सोमवारीच औरंगाबाद येथे गेले आहेत. मंत्री सवरा यांच्या घराला घेराव घालण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्त्वात रॅली जात असता तिला पोलिसांनी रस्त्यातच अडविले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या ठिय्यामुळे वाडा-मनोर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतूक कंचाडमार्गे वळवली.
आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी, आदिवासी विद्यार्थी यांचे प्रश्न अधिक गंभीर बनत आहेत. आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू, रोजगारासाठीचे स्थलांतर, आश्रमशाळांतील अपुऱ्या सुविधा, रोजगार आणि देवस्थानच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासी विकास मंत्री सवरा असंवेदनशीलपणे हाताळत आहेत. याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
दोन दिवसांत आपण मंत्रालयात चर्चा करू त्यासाठी आपल्या शिष्टमंडळाची व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावतो, आपण ठिय्या मागे घ्यावा हा विष्णू सवरा यांनी दिलेला प्रस्ताव किसान सभेने फेटाळून लावला असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सवरा यांच्या निवासस्थान परिसरातील ठिय्या कायम राहिल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे याबाबत काही समेट होण्याची आशा मावळली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष कॉ. जे. पी. गावित, कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. 
----------
बससेवा ठप्प झाल्याने पायपीट
सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाडा-मनोर, भिवंडी-वाडा महामार्ग जाम केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याचा फटका व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना बसला. तर या कोंडीमुळे बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह, स्थानिकांना पायपीट करावी लागली.

 

Web Title: Thousands of angry tribals surrounded the house of Vishnu Sawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.