राज्यात भाजप नेत्यांच्या हजार जाहीर सभा; पहिली सभा १ एप्रिल रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:36 AM2019-03-30T01:36:12+5:302019-03-30T01:36:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यात भाजप नेत्यांच्या एक हजारावर प्रचारसभा होणार आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यात भाजप नेत्यांच्या एक हजारावर प्रचारसभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रांतही भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला कोल्हापुरात प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा राज्यात होतील. या नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ आदी नेतेही राज्यातील भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील.