मालवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:48 AM2018-07-26T01:48:04+5:302018-07-26T01:48:25+5:30
उद्योगधंद्यांना ब्रेक; जीवनाश्यक वस्तुंची आवक मंदावली
मुंबई : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे राज्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प होऊन उद्योगधंदे थंडावले आहेत. अकोला, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर १२ हजार टन खतांचा साठा पडून राहिला आहे. त्यामुळे शेतीवर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.
भुसार, भाजीपालासह जीवनावश्यक वस्तूंची आवक बाजारात मंदावली आहे. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कच्च्या मालाच्या अभावामुळे तसेच तयार माल पडून राहिल्याने औद्योगिक वसाहतीमधील काम मंदावले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात निर्यात केली जाते; ती ठप्प होऊन २०० कोटींची उलाढाल थांबली आहे. भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे.
मराठवाड्यातील उद्योगाला १२५ कोटींचा फटका बसला आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. संपामुळे जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे २४ तास चालणारी यंत्रांना ब्रेक लागला असून उत्पादन १५ टक्क्यांनी घटले आहे.
१२ हजार टन खतांचा साठा पडून
महाराष्ट्राच्या इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचा१२ हजार टन खतांचा साठा जळगाव, भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर पडून आहे. या साठ्याची उचल कशी करावी, हा पेच आता प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. पावसाचे दिवस आहेत. अकोला रेल्वे स्थानकावरील गोडावूनमध्ये जागा नाही. रेल्वे स्थानकावर उतरलेले रासायनिक खत हलविण्याची दुसरी यंत्रणा नाही. निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मालवाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाºयांना खत वाहतूक करण्याची विनंती केली. परंतु त्यांनी नकार दिला आहे.