मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 09:24 PM2017-10-21T21:24:24+5:302017-10-21T21:24:29+5:30

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात पार पडला.

Thousands of devotees visit devotees to visit Lord Dev Rameshwar-Narayana in Malvan, Palkhi Jubilee | मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह  

मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह  

Next

मालवण - शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात पार पडला. मालवण शहर तसेच जिल्ह्यातील हजारो भाविकांच्या गर्दीने मालवण बाजारपेठ फुलून गेली होती. मालवणच्या अभूतपूर्व चैतन्यदायी पालखी सोहळ्याने दिवाळी पाडव्यादिवशी ग्रामदेवतांच्या पालखीचे दर्शन घेऊन ‘मालवण’कर धन्य झाले. 

पालखी सोहळ्याच्या निमित्ताने किनारपट्टीवर स्वच्छतेचे संदेश देणारे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. तर मच्छिमार बांधवांनी मासेमारी होड्यांची सजावट करून पालखीचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, मालवणवासीयांकडून ठिकठिकाणी करण्यात येणारे पालखीचे भव्य स्वागत, विद्युत रोषणाई व ग्राहकांनी फुलून गेलेली बाजारपेठ आदींनी पाडव्याचा पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला. नोटाबंदी व जीएसटीचा प्रभाव बाजारपेठेत जाणवत असला तरी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेतील दुकानात ग्राहकांची गर्दी होती. 
मालवणातील ऐतिहासिक श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी सोहळ्यास शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरुवात झाली. गावकर, मानकºयांनी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाºहाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडली. देवतांच्या स्वागतासाठी भक्तजनांकडून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शिवकालीन पालखी आडवण येथील श्री देवी सातेरीची भेट घेऊन पुढे वायरी येथे भूतनाथ देवालयामध्ये रामेश्वर नारायण देवतांची पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे-गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात आले. 
भूतनाथ मंदिर येथे गा-हाणे, देवतांचे दर्शन व देवभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर देवतांची पालखी समुद्रीमार्गे मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर येथे आली. दांडेश्वर मंदिर, श्री देवी काळबाई मंदिर, जोशी मांड येथे बहीण-भावांची भेट घेत पालखी बाजारपेठ रामेश्वर मांड येथे ८ वाजता दाखल झाली. 

व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नाना पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर,  माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, पूजा करलकर, ममता वराडकर, परशुराम पाटकर, बाळू तारी, बाळू अंधारी, रवी तळाशीलकर, मुकेश बावकर, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, उदय मोरे, दादा कांदळकर, उमेश बांदेकर, आबा हडकर, शेखर गाड, सदा चुरी, दिलीप वायंगणकर, राजू बिडये, सन्मेष परब, रुपेश प्रभू आदी भक्तांनी दर्शन घेतले.  ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होण्यासाठी व श्री देव रामेश्वर-नारायण पालखीचे दर्शन घेण्यासाठी समस्त मालवणवासीय आतुरलेले होते. ठिकठिकाणी जंगी स्वागत झालेली पालखी बाजारपेठ येथील रामेश्वर मांड येथे दर्शनासाठी थांबताच भाविकांची गर्दी झाली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेण्यात आले. रात्री १० वाजल्यानंतर पालखी बाजारपेठ, भरड, देऊळवाडा मार्गे पुन्हा मंदिरात मार्गस्थ करण्यात आली. 

रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओढा कमी झाला नव्हता. एसटीच्या संपामुळे गेले चार दिवस बाजारपेठेवर परिणाम जाणवला होता, मात्र पालखी सोहळ्यात एसटी संपाची झळ बसली नाही.  पोलीस प्रशासनाकडून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठेत बच्चे कंपनी वाळूचे किल्ले बनवून आपला आनंद द्विगुणीत करत होते. वीज वितरणच्या कर्मचारी वर्गानेही अखंडित आपली सेवा बजावली.

Web Title: Thousands of devotees visit devotees to visit Lord Dev Rameshwar-Narayana in Malvan, Palkhi Jubilee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.