गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात हजारो विस्थापित
By Admin | Published: April 15, 2017 01:37 AM2017-04-15T01:37:14+5:302017-04-15T01:37:14+5:30
मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.
मुंबई : मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पबाधितांचे जीवन रूळावर आणण्यात येणार आहे.
गारगाई प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात वाडा येथील वैतरणा नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. तर जवाहर येथील पिंजाळ नदीवर पिंजाळ धरण उभे राहणार आहे. मात्र या प्रकल्पाची वाट मोकळी करण्यासाठी महापालिकेला आधी येथील विस्थापितांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे लागणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आराखडा ठेवला आहे.
त्यानुसार गारगाई धरण प्रकल्पामुळे सहा गावांतील १९१ कुटुंब तर पिंजाळ प्रकल्पात ११ गावांतील ८६५ कुटुंब विस्थापित होणार आहेत. गारगाई प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५६ कोटी तर पिंजाळ प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी २४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
- मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स आहे.
- गारगाई प्रकल्पातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लीटर्स प्रती दिन आणि पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लीटर्सने दररोजचा जलसाठा वाढणार आहे.
- गारगाई प्रकल्पात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५४ कोटी आणि पिंजाळ प्रकल्पात २४६ कोटी बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाठी खर्च केले जाणार आहेत.
- या गावांबरोबरच ७५० हेक्टर्स तानसा वन जीवनही विस्थापित होणार आहे.
- वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येथे आहे.
- या प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये महापालिका मोजणार आहे.