हजारो डोळ्यांपुढे चमकले काजवे...

By Admin | Published: June 15, 2016 02:36 PM2016-06-15T14:36:50+5:302016-06-15T14:36:50+5:30

सह्याद्रीची सर्वांत उंच कळसूबाईची पर्वतरांग...गर्द हिरवाईने नटलेला भंडारदऱ्याजवळचा रतनवाडी घाटमार्ग... वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा होणारा आवाज... अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस

Thousands of eyes shine brightly ... | हजारो डोळ्यांपुढे चमकले काजवे...

हजारो डोळ्यांपुढे चमकले काजवे...

googlenewsNext

काजवा महोत्सव : निसर्गप्रेमींनी फुलला भंडारदरा-रतनवाडी घाट

अझहर शेख,  नाशिक
सह्याद्रीची सर्वांत उंच कळसूबाईची पर्वतरांग...गर्द हिरवाईने नटलेला भंडारदऱ्याजवळचा रतनवाडी घाटमार्ग... वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा होणारा आवाज... अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस अशा नयनमनोहारी निसर्गरम्य वातावरणात कुट्ट अंधारात रातकिड्यांची किरकिरच्या साथसंगतीने रंगलेले काजव्यांचे नृत्य पाहताना हजारो निसर्गप्रेमींच्या डोळ्यांपुढे काजवे लखलखले.

भंडारदऱ्याच्या आल्हाददायक निसर्गरम्य वातावरणानेही कात टाकली आहे. रात्रीच्या वेळी या वातावरणात निसर्गाच्या मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला काजव्यांचा उत्सवाने ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक अशा विविध शहरांमधील निसर्गप्रेमींना याड लावल्याचे चित्र विकेण्डला बघावयास मिळत आहे.

काजव्यांची ही अद््भुत दुनियेचा आनंद घेण्यासाठी काही निसर्गप्रेमी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसून येतात; मात्र त्याचवेळी काही मद्याच्या धुंदीत असलेल्या मद्यपींचा वात्रटपणाही यावेळी बघावयास मिळतो हे दुर्दैव! घाटमार्गातून जाताना कर्णकर्कश हॉर्न, म्युझिक वाजविण्यावरच ही मंडळी थांबत नाही तर जे निसर्गप्रेमी अंधाराच्या साम्राज्यात हातातील विजेरीच्या साहाय्याने काजव्यांचे नृत्य डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांनाही डिवचण्याचा भ्याड प्रयत्न ही वात्रट जमात करताना दिसून येते.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाने ‘काजवा’ महोत्सवासाठी माफक दरात एका खासगी ट्रॅव्हल्समार्फत निसर्गप्रेमींसाठी वाहनव्यवस्थेसह, न्याहारी, भोजनाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी अकोला तालुक्यातील या निसर्गाच्या उत्सवासाठी निसर्गप्रमी मोठ्या संख्येने रतनवाडी, भंडारदऱ्याकडे लोटले आहे. सध्या हा निसर्गाचा उत्सव समारोपाकडे झुकत आहे.

राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक सतीश सोनी यांनीही शनिवारी (दि.१२) या ठिकाणी भेट दिली. भंडारदरा, शेंडी या गावातून स्थानिक तरुणांना गाइड म्हणून पर्यटकांनी सोबत घेऊन जावे.


डोळ्यांनी टिपावे काजव्यांचे नृत्य

हजारोंच्या संख्येने मनमुरादपणे बागडणारे काजवे रात्री बघताना त्यांची वस्ती असलेल्या सादडा, बेहडा, बोंडारा, उंबर या देशी झाडांवर रंगलेले काजव्यांचे नृत्य केवळ डोळ्यांनी टिपावे. छायाचित्रणाचा विनाकारण मोह करूच नये. कारण, कुट्ट अंधारात काजव्यांची चमचम कुठल्याहीप्रकारे कितीही मेगापिक्सेलच्या भ्रमणध्वनी कॅमेऱ्यांद्वारे टिपणे अशक्यच आहे. एवढेच नाही, तर हा निसर्गाचा अनुपम उत्सव मोठ्या प्रोफेशनल डीएसएलआर कॅमेऱ्यातही बंदिस्त करता येत नाही. मायक्रोलेन्स व्यतिरिक्त कुठलीही लेन्स या उत्सवासाठी निरुपयोगी ठरते. त्यामुळे फ्लॅशचा वापर करत विनाकारण काजव्यांचा जीव धोक्यात आणण्याचा पर्यटकांनी प्रयत्न करू नये, असे निसर्ग अभ्यासकांचे म्हणणे आहे.



अशी घ्यावी दक्षता
भंडारदरा ते रतनवाडी हा घाटमार्ग संपूर्ण जंगलाचा परिसर असून, वनविभागाच्या अखत्यारित येतो. रात्री येथून मार्गस्थ होताना वाहनांचा वेग मर्यादित व दिव्यांचा प्रकाशही कमी स्वरूपात ठेवावा व हॉर्न वाजवू नये. भ्रमणध्वनीची रिंगटोन बंद ठेवावी. मूतखेल गावात आल्यावर डावीकडे वळण घेत रतनवाडीच्या दिशेने पुढे जावे. येथून दहा किलोमीटर अंतरावर रतनवाडी हा रतनगडच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. या ठिकाणी पुरातन अमृतेश्वर मंदिर आहे. याच मार्गावर खऱ्या अर्थाने काजव्यांनी लखलखणारे काही झाडे नजरेस पडतात. अंधाऱ्या रात्री सुरू असलेला काजव्यांचा उत्सव केवळ डोळ्यात साठविता येतो. जंगलाचा परिसर असल्यामुळे हातात विजेरी ठेवावी; मात्र अनावश्यक वापर टाळावा. जैवविविधतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, याची संपूर्ण दक्षता निसर्गप्रेमींनी घेणे गरजेचे आहे.


काजवा महोत्सवानिमित्त भंडारदरा परिसरात पर्यटकांचे भरते आले. यामुळे रहिवाशांच्या हातांनाही रोजगार मिळाला. ट्रॅव्हल एजंट किंवा स्थानिक गाइड यांच्या मदतीने काजवे बघणारे पर्यटकांकडून नियम व सूचनांचे पालन केले जाते; मात्र वैयक्तिक स्वरूपात आलेल्या पर्यटकांनी निसर्गाशी जुळवून न घेता केवळ मौजमस्ती करण्याच्या उद्देशाने घाटमार्ग पालथा घातला. यामुळे जैवविविधता काही प्रमाणात बाधित झाली. यावर्षी पर्यटकांनी काजवा महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला. पर्यटकांनी काजवे बघताना निसर्गनियमांचे पालन करत स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे.
- अंबरीश मोरे, मार्गदर्शक



काजवा महोत्सवाला यावर्षी निसर्गप्रेमींनी उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. नाशिककरांबरोबरच अन्य शहरांमधील नागरिकांचीही मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून भंडारदरा परिसरात गर्दी लोटत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे. भंडारदऱ्याचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटन महामंडळासह खासगी निवास व्यवस्थेची नोंदणी हाऊसफुल्ल झाली आहे. यंदाचा काजवा महोत्सव यशस्वी झाला असून, विकेण्डला पर्यटकांची मध्यरात्रीपर्यंत वर्दळ दिसून आली.
- प्रज्ञा बडे-मिसाळ, प्रादेशिक व्यवस्थापक

Web Title: Thousands of eyes shine brightly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.