हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर दिवसाला आली ९ लाख युनिट सौरऊर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:16 AM2020-10-05T03:16:08+5:302020-10-05T03:16:17+5:30
११० प्रकल्प; मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, चार हजार कोटींची गुंतवणूक
- सचिन लुंगसे
मुंबई : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरण, महानिर्मितीसोबत वीजखरेदी करार केले असून, याद्वारे राज्यातील ११० प्रकल्पांतून दिवसाला ९ लाख युनिट सौरऊर्जा मिळत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना ती वापरता येत असून, याद्वारे १ लाख ९ हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचत आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
२०० आणि ३०० अशा ५०० मेगावॅटच्या वीज खरेदी करारानंतर पुन्हा महानिर्मितीसोबत २८० मेगावॅटचा करार करण्यात आला आहे. एकूण या योजनेंतर्गत ७८० मेगावॅट विजेचे करार होत आहेत.
शेती पंपासाठी ज्या वाहिन्या वेगळ्या झाल्या. त्याद्वारे वाजवी वीजदरात कशी वीज देता येईल, हा याचा उद्देश आहे. महावितरणची जिथे उपकेंद्र आहेत, तेथील पडकी जमीन यासाठी वापरली जात आहे. छोटे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
शेतकºयांना होणार फायदा
उपकेंद्रालगत प्रकल्प उभारल्याने वीजहानी होत नाही. शेती पंपाचा फिडरदेखील येथेच जोडला जातो. त्यामुळे विजेची हानी कमी होत आहे.
नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव आणि मुळुज येथे अनुक्रमे ५.२३, २.७ मेगावॅट क्षमतेचे दोन सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले. या गावासह लगतच्या ८ हजार शेतकºयांना फायदा होणार आहे. कारण एक सौरकृषी वाहिनी साधारण पाच ते दहा गावांतून जाते.
कोरोनाच्या काळात ५० मेगावॅटच्या क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले असून, या योजनेतून दीड हजार लोकांना रोजगार मिळाला.
वीजहानी कमी होण्यास मदत
सब स्टेशनच्या बाजूलाच सौरऊर्जा प्रकल्प लावल्यामुळे वीजहानी कमी होण्यास मदत होते. शेतकरी वीजबिल भरण्यास मदत करतील.
- सतीश चव्हाण, संचालक व्यावसायिक, महावितरण
वाजवी दरात वीज
राजस्थान, यूपी, हरियाणा, पंजाब राज्यात हा प्रकल्प राबविला जाईल. महाराष्ट्रात ४४ हजार कृषी ग्राहक आहेत. सौरऊर्जा करारानुसार वीजदर प्रति युनिट ३ रुपये आहे. वीजखरेदी करार कमी किमतीत झाल्याने ग्राहकांना फायदा होईल. वाजवी दरात वीज उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे.
- दीपक कोकाटे, प्रमुख, महाराष्ट्र, एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड