धुळगावमध्ये गॅस्ट्रोचे शंभरावर रुग्ण
By admin | Published: January 7, 2015 10:00 PM2015-01-07T22:00:28+5:302015-01-08T00:02:53+5:30
दूषित पाण्याचा फटका : ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा
सोनी : धुळगाव (ता. तासगाव) येथे गॅस्ट्रोसदृश तापाची लागण झाली असून, सुमारे शंभरावर रुग्ण या साथीने आजारी आहेत. गावामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्याने लोक आजारी पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.धुळगाव येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी चार दिवसांपासून आलेले नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी गेल्या दोन दिवसांपासून नळांना सोडले. विहिरीच्या पाण्याचा उपसा नसल्याने ते दूषित झाले असून, ते पिल्यामुळे नागरिकांना जुलाब, उलटी व तापाचा त्रास जाणवू लागला असून, गावातील ७० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणी सोडण्यापूर्वी काळजी घेतली नाही. त्यातच गावात नळासाठी खोल खड्डे खणले आहेत. त्यामध्ये गटारीचे पाणी जाऊन हा त्रास वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर डुबल म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याचे पाणी गावात सोडताना योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे ही साथ पसरली आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासास ग्रामपंचायत जबाबदार आहे. धुळगाव येथे गॅस्ट्रोची साथ आहे, हे समजताच तासगाव पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या योजना शिंदे यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली व वैद्यकीय पथकांना योग्य दक्षता घेण्याची सूचना केली. (वार्ताहर)
पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी
विहिरीच्या पाण्यामध्ये अळ्या आढळून आल्या असून, पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. असे पाणी पिल्याने ग्रामस्थांना त्रास जाणवू लागला आहे. रुग्णांमध्ये वृद्धांचा व लहान मुलांचा समावेश अधिक प्रमाणात आहे. गावात अनेक कुटुंबांतील सर्वच सदस्य आजारी पडल्याने बाहेरगावचे त्यांचे नातेवाईक येऊन त्यांची काळजी घेऊ लागले आहेत.