सात कुटुंबांच्या आयुष्यात तान्हुल्या मुलींनी उभी केली आनंदाची गुढी
By admin | Published: March 29, 2017 09:25 PM2017-03-29T21:25:07+5:302017-03-29T21:26:04+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या या मुलींचे आई - वडिलांबरोबरच त्यांच्या इतर नातेवाईकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले
शोभना कांबळे/ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 29 - मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी उपक्रम सुरू असतानाच येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात चैत्र शुक्ल प्रतिप्रदा अर्थात गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या ११ प्रसूतीत सात महिलांनी मुलींना जन्म दिला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या या मुलींचे आई - वडिलांबरोबरच त्यांच्या इतर नातेवाईकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.
जिल्हा रुग्णालयात आता प्रसुतिपूर्व आणि प्रसुतिपश्चात सर्व मातांना जननीसुरक्षा योजनेंतर्गत अनेक सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आता प्रसुती कक्षात मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. प्रसूतीला आणण्यासाठी तसेच प्रसूतीनंतर बाळ आणि मातेला घरी पोहोचवण्यासाठीही वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयात प्रसुतिसाठी अनेक मातांना दाखल केले जात आहे.
या रूग्णालयात गुढी पाडव्याच्या दिवशी मंगळवारी २० महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ११ महिलांची प्रसूती झाली. यापैकी जान्हवी गुरव, रेखा शिंदे, भाग्यश्री राजापकर, नंदिनी शिंदे, मालन राठोड, जान्हवी गोताड आणि जान्हवी शितप या सात महिलांना कन्यारत्न झाले, तर चार महिलांनी मुलाला जन्म दिला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या या मुलींच्या जन्माने त्यांच्या माता- पित्यांनाच नव्हे; तर त्यांच्या इतर आप्तांनाही आनंद झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली तर ज्यांना मुलगा झाला, त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे भाव दिसून येत होते. एकूणच मुलगा होवो वा मुलगी, आपण आई-वडिल बनल्याचा आनंद या प्रत्येक जोडप्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
१ ते २८ मार्च या कालावधीत रूग्णालयात १८५ महिला प्रसुतिसाठी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ८० महिलांनी मुलींना जन्म दिला आहे, तर ९७ महिलांना मुलगा झाला आहे. आठ मुले जन्माला येतानाच मृत्यू पावली आहेत. पूर्वी मुलीच्या जन्माने नाक मुरडणारा समाज आता मुलीच्या जन्माचे स्वागत उत्साहाने करू लागला आहे, हा बदल मुलींसाठी नक्कीच स्वागतार्ह मानायला हवा.
मुलीच्या जन्माचे स्वागत
शिवानी महाकाळ यांचीही रविवारी जिल्हा रूग्णालयात प्रसुति झाली आहे. याआधीही त्यांची शुभ्रा ही तीन वर्षाची मुलगी आहे. मात्र, दुसरीही मुलगी झाली म्हणुन आम्ही कुणीच अजिबात नाराज नाही. उलट तिचेही आम्ही तेवढ्याच आनंदाने स्वागत केले आहे, अशी प्रतिक्रिया शिवानी महाकाळ व त्यांचे पती शिवराज महाकाळ यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांच्या इतर नातेवाईकांनाही आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
याआधी एक मूल गेलं. त्यामुळे आता जन्माला आलेल्या या बाळामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. मुळात आम्ही मुलगा - मुलगा अशी अपेक्षा ठेवलीच नव्हती. त्यामुळे मुलीच्या आगमनाने आम्ही खूप आनंदी आहोत. मात्र, यापुढे आम्हाला तिचा दोनवेळा वाढदिवस साजरा करायला हवा.
- जान्हवी गुरव, रोहिदास गुरव