ठाणेकरांचे हात हजारो, दुबळी...

By admin | Published: June 5, 2017 03:18 AM2017-06-05T03:18:55+5:302017-06-05T03:18:55+5:30

ग.दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय शेअर फाउंडेशनच्या ‘शेअर स्ट्रीट’ या उपक्रमातून ठाणेकरांना आला.

Thousands hand thousands, weak ... | ठाणेकरांचे हात हजारो, दुबळी...

ठाणेकरांचे हात हजारो, दुबळी...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ या ग.दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय शेअर फाउंडेशनच्या ‘शेअर स्ट्रीट’ या उपक्रमातून ठाणेकरांना आला. गरजूंना देण्यासाठी अक्षरश: शेकडो हात पुढे आले... मात्र, ते घेणाऱ्यांची संख्या अपुरी पडल्याने दानशूर ठाणेकरांकडून जमा झालेली ट्रकभर भांडी आणि कपडे पुन्हा आपल्या गोदामात ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली.
ठाणेकरांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादामुळे १५ दिवसांनी वागळे इस्टेट येथील इंदिरानगर, कळव्याच्या आतकोनेश्वरनगर, फुलेनगरसारख्या ठिकाणी हा उपक्रम पुन्हा राबवणार असल्याचे शेअर फाउंडेशनच्या निशीता अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि विलास साठे यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी आवाहन केल्याप्रमाणे ठामपा मुख्यालयासमोरील कचराळी तलावासमोर रविवारी एका विशेष ‘शेअर स्ट्रीट’चे आयोजन केले होते. सकाळी ७ ते ११.३० दरम्यान हा मोफत देवाणघेवाणीचा अभिनव उपक्रम पार पडला. या ठिकाणी १२ स्टॉल लावले होते. संपूर्ण ठाणे शहरातून आलेल्या साधारण ९० ते १०० रहिवाशांनी या ठिकाणी जुने परंतु चांगले कपडे, खेळणी आणि भांडी जमा केली. ती घेण्यासाठी सिद्धेश्वर तलाव परिसरासह आजूबाजूच्या गरजूंनी येथे गर्दी केली. साधारण २५० ते ३०० रहिवाशांनी कुपन घेऊन रीतसर आपल्याला हव्या त्या वस्तू येथून घेतल्या. फाउंडेशनकडे यापूर्वी अर्धा ट्रक असे सामान नागरिकांनी जमा केले होते. रविवारी यात भर पडून ते दोन ट्रक भरतील, इतके जमा झाले. जितके सामान जमा झाले, त्या तुलनेत घेणाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उरलेल्या सामानासह आयोजक स्वयंसेवकांना आवराआवर करावी लागली. ठाण्याचे आ. संजय केळकर यांच्यासह शेअर फाउंडेशनच्या शिवानी वर्मा, आचल सदारंगानी, यज्ञेश गोडसर, सयाना पवित्रण, राहुल श्रीवास्तव आणि पूजा जैन आदी २५ स्वयंसेवकांनी ठामपाच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी केला. यातून साधारण चार बॉक्स भांडी, कपडे आणि इतरही सामान जमा झाले असून ते गरजूंना देण्यासाठी पुन्हा शेअर स्ट्रीटचे आयोजन करणार असल्याचे विलास साठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आपल्या वस्तूंचा योग्य प्रकारे विनियोग होत असल्याचे पाहून देणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विनामूल्य गरजेच्या वस्तू मिळाल्याने घेणाऱ्यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Thousands hand thousands, weak ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.