संकटकाळात मदतीचे हात हजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:38 AM2021-04-23T05:38:35+5:302021-04-23T05:38:45+5:30
कोरोनामुळे एकीकडे उद्योग, व्यवसायावर गंडांतर आले आहे तर दुसरीकडे रुग्णांची परवड होत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर मिळत नसल्याची स्थिती तर कुठे बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. मात्र या संकटकाळात मदतीचे हातही पुढे आले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी उपचार व सेवाकार्यास हातभार लावला आहे.
१५००
डब्यांचे रोज मोफत वाटप
अनेक सामाजिक संस्थांनी काेविड सेंटर उभारणीपासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. जेवण तयार करण्यापासून ते रुग्णालयात पोहोचविण्यापर्यंतचे सर्व काम या संस्थाच करीत आहेत.
लंगरने भागविली भूक
n घरघर लंगर, टीम ५७, सिंधी, पंजाबी, शीख सामाजिक संस्था यासारख्या अनेक संस्था रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण पुरवित आहेत. घरघर लंगरकडून पाच रुग्णालयांत मागेल त्याला पॅक बंद जेवण दिले जात आहे.
n आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ५७ जेवण पुरविण्याचे काम करीत आहे.
n सिंधी, पंजाबी- शीख सामाजिक संस्थेकडून जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रोज ७०० हून अधिक जणांना डबे पुरवितात.
लोकप्रतिनिधींचाही मदतीचा हात...
केदारेश्वर साखर कारखाना (पाथर्डी), विविध सामाजिक संस्था (अकोले), आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (कोपरगाव), साईबाबा संस्थान (शिर्डी) माजी आमदार चंद्रशेखर घुले (शेवगाव), शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट, नगर शहरात अनाप प्रेम, रोटरी क्लब आदी संघटनांनी कोविड सेंटर उभारले आहे.
माणुसकीचे दर्शन
जळगावातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अनेकांना आधार मिळत आहे. सेवारथ परिवारतर्फे ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यासह लोकसंघर्ष माेर्चाने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिले असून जनमत प्रतिष्ठान गरजूंचे उदरभरण करीत आहे. सेवारथ परिवाराचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. तसेच रोटरी क्लब, रोटरी क्लब मिडटाऊन, रोटरी क्लब वेस्ट, रोटरी क्लब सेंट्रल, श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार मंडळ व अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले.
लोकसहभागाचा पॅटर्न
कट अवस्थेत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी रुग्णालयांची व्यवस्थाही अपुरी पडत आहे, त्यामुळे विविध सेवाभावी संस्था तसेच लाेकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला असून, नाशिक महापालिकेच्या मदतीने विविध खासगी कोविड केअर सेंटर्स उभारले आहेत. विशेष म्हणजे अनेक कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लोकसहभागातून कोरोना उपचाराचा नवा पॅटर्न यामुळे उदयास आला आहे.
n अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन भुजबळ नॉलेज सिटी तसेच महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने पंचवटीतील विभागीय क्रीडासंकुलात अद्ययावत ३९५ खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे.
n विशेष म्हणजे यात १८० ऑक्सिजन बेड्सदेखील आहेत. याशिवाय वाचनालय, बुद्धिबळ आणि कॅरमसारख्या खेळांची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
n महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि गटनेते विलास शिंदे, भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी लोकसहभागातून कोविड सेंटर उभारले आहे.
n तीन कोविड सेंटर मिळून तीनशे बेड उपलब्ध झाले आहेत, तर जैन समाजाच्या जितो या संस्थेच्या वतीने एका तारांकित हॉटेलमध्ये ३५ खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
शिवदुर्ग प्रतिष्ठानचे मदतकार्य
प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानने मदत केंद्र सुरू करून यंत्रणेला मोठा आधार दिला आहे. भाडणे येथील कोविड केअर सेंटर येथे शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. प्रतिष्ठानचे स्वयंसेवक स्वत:ची काळजी घेत कोविड सेंटरमध्ये शक्य ती सर्व प्रकारची कामे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिक येथे कार्यरत असलेले कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनोहर शिंदे यांनीही प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा दिवस येथे मोफत वैद्यकीय सेवा दिली. डॉ. अनिल नांद्रे व इतर काही डॉक्टरही सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवेसोबत औषधांची मदतही केली जात आहे.
लोकसंघर्ष मोर्चा कोविड सेंटर
n लोकसंघर्ष मोर्चाने नि:शुल्क कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी ४७१ रुग्ण दाखल झाले. त्या पैकी २९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णवाहिकेची तत्काळ उपलब्धता हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरत आहे.
n चहा, नाश्ता, जेवण दिले जाते. मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.