स्वतंत्र विदर्भासाठी लढणार हजारो वकील
By admin | Published: August 1, 2016 10:30 PM2016-08-01T22:30:31+5:302016-08-01T22:30:31+5:30
स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अॅड. विनोद तिवारी म्हणाले, हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ घेण्यात आलेला नाही. वकील स्वत:च्या आवश्यकतेसाठी स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. ६०७ कायदेविषयक संहितांमधून २७७ संहितांमध्ये शासनाला अपील व पुनर्विचार अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी वकिलांना वारंवार मुंबईला जावे लागते. नागपुरात अपिलीय अधिकाऱ्याचे कार्यालय स्थापन करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गरजू पक्षकारांना मुंबईला जाण्याचा खर्च परवडत नाही. यामुळे त्यांना वेळेवर न्याय मिळत नाही. परिणामी असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत असे त्यांनी सांगितले.
अॅड. सुदीप जयस्वाल यांनी स्वतंत्र विदर्भासाठी सप्टेंबरमध्ये विदर्भातील वकिलांचे महासंमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. संमेलनात ३० हजारावर वकील सहभागी होतील. एकट्या नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५ हजार वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.