२८६० कोटींचा विक्रीकर बुडवून हजारो व्यापारी बेपत्ता! - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:32 AM2018-03-07T06:32:05+5:302018-03-07T06:32:37+5:30
राज्यातील हजारो व्यापा-यांनी विक्रीकर विभागाला हजारो कोटींचा चूना लावून पलायन केले आहे. ३१ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटींचा विक्रीकर थकित असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबई - राज्यातील हजारो व्यापा-यांनी विक्रीकर विभागाला हजारो कोटींचा चूना लावून पलायन केले आहे. ३१ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटींचा विक्रीकर थकित असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
या बेपत्ता व्यापा-यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आयकर विभागासह पोलिस, महसूल आणि नगरविकास विभागाची मदत घेतली जात असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. पीपल्स् रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप आदी काँग्रेस सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे व्यापा-यांकडील थकित विक्रीकराचा मुद्दा उपस्थित केला. बेपत्ता व्यापा-यांकडे २८६०.१६ कोटी इतके विक्रीकर थकित असल्याचे मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात सांगितले. बेपत्ता व्यापा-यांचा शोध घेण्यासाठी ज्या ठिकाणी व्यापा-यांचा व्यवसाय चालू होता, त्या जागेच्या बाबतीत तहसीलदार अथवा तलाठी यांचे अभिलेख, नगरपालिका, महानगरपालिका यांचा मालमत्ता विभाग तसेच सबरजिस्ट्रार यांचे अभिलेख इत्यादीकडे चौकशी करून व्यापा-यांचा ठावठिकाण व मालमत्ता शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच पोलिस स्टेशन, पोस्ट आॅफीस, कंपनी रजिस्ट्रार यांचे अभिलेख, इंटरनेट वरूनही व्यापा-यांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वसुली प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये व्यापा-यांची बँक खाती आणि मालमत्तेवर टाच आणण्यात येईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.
व्यापाºयांचा ठावठिकाणा सापडेना
काही प्रकरणांमध्ये व्यापारी व्यवसायाचे ठिकाण सोडून गेल्यामुळे आणि त्यांचा नवीन व्यवसायाचा ठावठिकाणा सापडत नसल्यामुळे प्रलंबित थकबाकीची वसुली होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सर्व प्रकरणात प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधून प्रलंबित थकबाकीच्या वसुलीसाठी व्यापा-याचे अद्ययावत बॅँक खाते आणि इतर तपशील मिळवण्यासाठी विक्रीकर विभाग प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली . बेपत्ता व्यापा-यांच्या बाबतीत संबंधित आस्थापना आणि तपास संस्थाकडे चौकशी करून बेपत्ता व्यापा-यांचा ठावठिकाणा शोधण्याचे आदेश विक्रीकर विभागाला दिल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.