शरद पवार गटाकडे इच्छुकांचे हजारो अर्ज, उमेदवारी न मिळाल्यास..., पक्षाने इच्छुकांना घातली अशी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:28 PM2024-09-26T16:28:25+5:302024-09-26T16:29:46+5:30
Maharashtra Assembly Election 2024: सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हजारो अर्ज आले आहेत. तसेच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेताना शरद पवार गटाने घातलेल्या अटीचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार गटाला मिळालेलं यश विशेष उल्लेखनीय होतं. शरद पवार गटाने अवघ्या १० जागा लढवत त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हजारो अर्ज आले आहेत. तसेच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेताना शरद पवार गटाने घातलेल्या अटीचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला ८५ ते ९० जागा मिळू शकतात. या जागांवर इच्छूक असलेल्या उमेदवारांचे १३५० अर्ज पक्षाला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार नाही, असं प्रतिज्ञापत्र या इच्छुकांकडून स्टँपपेपरवर लिहून घेण्यात आलं आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या राखीव मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. तर अणुशक्तिनगरमधूनही ९ जण इच्छुक असल्याचं समोर आलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र मागच्या वर्षी पक्षात फूट पडल्यानंतर पक्षातील बहुतांश नेते हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले होते.