कीटकनाशकांचे दीड हजारांवर नमुने निकृष्ट; ३१,७०९ नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:36 AM2017-10-13T04:36:58+5:302017-10-13T04:37:17+5:30
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.
राजेश मडावी
चंद्रपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.
पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि अमरावती येथे कीटकनाशकांची गुणवत्ता तापसण्याच्या प्रयोगशाळा आहेत. येथे तपासण्यात आलेल्या ३१,७०९ नमुन्यांपैकी १ हजार ६८१ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. हे नमुने गेल्या पाच वर्षांतील असले तरी सध्याच्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा हा अहवाल लक्षवेधी ठरला आहे. विदर्भातील १८ कीटकनाशके अप्रमाणित निघाली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगशाळेने मूलभूत शिफारसी केल्या होत्या. त्याकडे डोळेझाक केल्याचेही दिसून येत आहे.
हेल्मेट घालून फवारणी
यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३४ शेतकºयांचा बळी गेला. त्यामुळे सतर्क होऊन शेतकरी आता चक्क हेल्मेट घालूनच पिकांवर फवारणी करू लागले आहेत.
फवारणीमुळे होत असलेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सहा जिल्ह्यांतून कीटकनाशके तपासणीचे प्रमाण वाढू लागले आहे. आॅक्टोबरमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ४० नमुने तपासणीसाठी आले आहेत.
- डी.आर. दारोरकर, रसायन शास्त्रज्ञ, अमरावती