नाशिकचा लाखचोर पोलीस उपनिरीक्षक जाधवला ५० हजारांची लाच घेतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 09:03 PM2017-11-17T21:03:29+5:302017-11-17T21:05:34+5:30
नाशिक : न्यायालयात दाखल करण्यात येणा-या पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मावसभावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात ७३ / २०१७ अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रारदार हे साक्षीदार आहेत़ न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करताना तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी तपासी अंमलदार तथा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांनी तक्रारदाराकडे गुरुवारी (दि़१६) ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (दि़१७) उपनगर परिसरातील टाकळीरोड येथे सापळा लावण्यात आला होता़ त्यानुसार उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़