‘एनसीव्हीटी’ परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांना शून्य गुण; गोंधळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:09 AM2017-09-23T05:09:47+5:302017-09-23T05:09:49+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (आयटीआय) घेण्यात येणा-या नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) परीक्षेच्या निकालात तांत्रिक कारणामुळे मोठा गोंधळ झाला आहे.
मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (आयटीआय) घेण्यात येणा-या नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) परीक्षेच्या निकालात तांत्रिक कारणामुळे मोठा गोंधळ झाला आहे. ४ हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला असून, यातील हजारो विद्यार्थ्यांना तर शून्य गुण मिळाला आहे. दुसरीकडे निकालात झालेल्या गोंधळावर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयटीआयमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना कंपनीमधून विशिष्ट व्यावसायिक शिक्षण मिळते. २०१३मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा २८ आॅगस्ट २०१६ रोजी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. यानंतर ५० दिवसांच्या आत एनसीव्हीटीची परीक्षा होते. यंदा प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आल्याने ही परीक्षा सहा महिने उशिरा झाली. शुक्रवार, २२ सप्टेंबरला उशिराने निकाल जाहीर झाला. यात ‘एम्प्लॉयबिलिटी’ या विषयात अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहे. या प्रकरणी संचालनालयात चौकशीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना ‘रिपीटर’चा अर्ज भरण्यास सांगितले.