हजारो विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By Admin | Published: July 2, 2015 12:36 AM2015-07-02T00:36:39+5:302015-07-02T00:39:01+5:30

स्वच्छता अभियान : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले वृक्षारोपण

Thousands of students took oath of cleanliness | हजारो विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

हजारो विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

googlenewsNext

नाशिक : हरित कुंभ करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी त्याची सुरुवात घरापासूनच करावी. परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच प्लॅस्टिकच्या वापरावर लगाम घालावा आणि किमान एक तरी झाड लावावे अशी शपथ नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजारो विद्यार्थ्यांना दिली.
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून या मोहिमेला प्रारंभ झाला. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची शपथ देण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महाजन म्हणाले, स्वच्छतेची शपथ मोहिमेपुरती मर्यादित न राहता तिचे नेहमी पालन होणे अपेक्षित आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. जमिनीची गुणवत्ताही कमी होते. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिकचा उपयोग करू नये व इतरांनाही असा कचरा करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोल्फ क्लबनंतर संदर्भ रुग्णालयात उपस्थित पेठे आणि सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना पालकमंत्री महाजन यांनी स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी राजेंद्र सिंह, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी सुखदेव बनकर, राजेंद्र मोगल, गोपाळ पाटील, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. यानंतर अशोकस्तंभ येथे पालकमंत्र्यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. याप्रसंगी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, डॉ. दिलीप धोंडगे आदि उपस्थित होते.
रविवार कारंजा येथे बोलताना राजेंद्र सिंह म्हणाले, नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत कुंभमेळ्यासारखा मोठा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकमध्ये नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत होत आहे. त्यामुळेच आपली विश्व जलशांती यात्रा नाशिकपासून सुरू करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
आडगाव नजीक असलेल्या ठक्कर डेव्हलपर्सच्या जागेत महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जितेंद्र ठक्कर आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सिद्ध पिंप्री येथील साने गुरुजी संचलित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात येऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेस नागरिकांसह, स्वयंसेवी-सामाजिक-शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of students took oath of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.