हजारो अनुदानित तुकड्या बंद होणार?
By admin | Published: July 7, 2015 02:20 AM2015-07-07T02:20:32+5:302015-07-07T02:20:32+5:30
संच मान्यतेतील जाचक अटींमुळे राज्यातील ६० हजार अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील हजारो तुकड्या बंद होण्याची भीती मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे.
मुंबई : संच मान्यतेतील जाचक अटींमुळे राज्यातील ६० हजार अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील हजारो तुकड्या बंद होण्याची भीती मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने आॅनलाइन संच मान्यतेतील त्रुटी दूर करून तातडीने पूर्वीप्रमाणे प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करण्याची मागणी केली आहे.
प्रचलित पद्धतीने एप्रिल २०१५पर्यंत संच मान्यता देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सदोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइन संच मान्यता करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील ९ ते १० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरवले जातील. शिवाय नवीन निकषांमुळे राज्यातील हजारो अनुदानित तुकड्या बंद होण्याची भीतीही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
याआधी संघटनेने मार्च २०१५मध्ये पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संघटनेसोबत बैठक घेऊन काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात एप्रिल २०१५मधील संच मान्यतेच्या मागणीसह २००३ ते २०११पर्यंतच्या एक हजार शिक्षकांची वाढीव पदे मंजूर केली होती. मात्र या दोन्ही आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी पूर्ण केलेले नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे सदोष सॉफ्टवेअर पद्धतीने संच मान्यता करू नये आणि मंजूर पदांवरील एक हजार शिक्षकांना तत्काळ वेतन देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
सरकारने मागणी मान्य केली नाही, तर लवकरच राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक असहकार आंदोलन पुकारतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यासाठी ९ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक संघटनेतर्फे इशारा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांबाहेर आंदोलन करून इतर शिक्षक पाठिंबा देतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ या शैक्षणिक संस्था चालकांच्या संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांनीही शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनुदान कपातीसाठी तुकड्या बंद करणाऱ्या सरकारविरोधात संस्था चालक गप्प बसणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)