इच्छुकांकडून संक्रांतीसाठी लाखोंचे वाण
By Admin | Published: January 17, 2017 02:07 AM2017-01-17T02:07:19+5:302017-01-17T02:07:19+5:30
आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने मतदार संख्याही वाढली आहे.
चिंचवड : आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने मतदार संख्याही वाढली आहे. संक्रांतीचेनिमित्त साधून मतदारांपर्यंत जाता यावे म्हणून इच्छुक उमेदवारांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या निमित्ताने लाखो रुपयांचे ‘वाण’ भेटवस्तू म्हणून मतदारांना वाटप केले जात आहे. त्यामुळे मतदार राजा तर खूश आहेच, पण व्यापाऱ्यांनाही नोटाबंदीनंतर प्रथमच सुगीचे दिवस आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारण ३० ते ३५ हजार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून सर्व मतदारांना भेटणे अशक्य आहेत. त्यामुळे मकर संक्रातीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेऊन वाण वाटपाद्वारे मतदारांना प्रलोभने दाखविली जात आहेत. कमीत कमी ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांच्या वस्तू एक गठ्ठा खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे इच्छुकांनी वाण वाटपासाठी एकावेळी १० ते १५ हजार वस्तू खरेदी केल्यामुळे व्यापा-यांकडून सवलती दिली जाते. नोटाबंदीनंतर प्रथमच व्यापा-यांना या वस्तु खरेदीमुळे दिलासा मिळू लागला आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या वस्तू कार्यकर्त्यांमार्फत अथवा घरोघरी जाऊन छुप्या पध्दतीने वाटल्या जात आहेत. मकर संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा मुहूर्त वाण वाटपासाठी आहे. त्यामुळे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन वाण वाटपाचे नियोजन केले जात आहे.
साधारण एका पक्षातील विद्यमान नगरसेवकांनी प्रभागातील इच्छुक सहका-यांला घेऊन एकत्रितपणे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हे सर्व करीत असताना आचारसंहितेचा त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. (वार्ताहर)
>आकर्षक, महागड्या भेटवस्तू
मकर संक्रातीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महिलांना आकर्षित व घरगुती वापराच्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. कुंकवाचे करंडे, घरगुती वापराची भांडी, पैठणी, तांबे, पातले, डीनर सेट आदींचे वाण म्हणून वाटले जात आहेत. प्रभागातील महिला ही सर्वच इच्छुक उमेदवारांच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र शहरात फिरताना दिसत आहे.