नोकरी अन प्रशिक्षणाच्या नावाखाली तीन हजार तरुणांची करोडो रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 09:30 PM2016-08-22T21:30:02+5:302016-08-22T21:36:19+5:30

अडीच ते तीन हजार तरुणांची सुमारे सहा ते सात कोटींची वागळे इस्टेट येथील पीसी टेक्नॉलॉजी कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Thousands of youths worth crores rupees in the name of job unrestrained training | नोकरी अन प्रशिक्षणाच्या नावाखाली तीन हजार तरुणांची करोडो रुपयांची फसवणूक

नोकरी अन प्रशिक्षणाच्या नावाखाली तीन हजार तरुणांची करोडो रुपयांची फसवणूक

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २२ : नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरूपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील अडीच ते तीन हजार तरुणांची सुमारे सहा ते सात कोटींची वागळे इस्टेट येथील पीसी टेक्नॉलॉजी कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. कामगारांना एक आठवड्याची सुटी देऊन त्यांना गाफील ठेवून या कंपनीचे यश सिंग, छाया सिंग आणि पंकजकुमार हे तिघे संचालक अचानक पसार झाले. मेंटनन्स, वीजबिल, भाडे असे सर्वच पैसे थकवल्यामुळे गाळामालकाने कंपनीला सील ठोकल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर शेकडो तरुणांनी सोमवारी वागळे पोलीस ठाण्यात धडक देऊन तक्रार दाखल केली.

वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क आणि कासारवडवलीतील एम्बेसी पार्क अशा दोन ठिकाणी या कंपनीची कार्यालये आहेत. दोन्ही मिळून कंपनीत सुमारे ६०० मुले नोकरीला होती. या ठिकाणी नोकरीचे पत्र देऊन प्रशिक्षणासाठी प्रत्येकाकडून २५ हजार रुपये घेतले होते. प्रशिक्षणानंतर कोणीही कंपनी सोडली, तर प्रशिक्षणाचा खर्च वाया जाईल. त्यासाठी सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ही रक्कम घेण्यात येत असून वर्षभरानंतर ती परत करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्वांनी एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागल्याच्या आनंदात या कंपनीवर विश्वास ठेवला.

परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने तिच्या फरारी संचालकांना शोधण्याची मागणी या सर्वच तरुणांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली आहे. डेहराडून (उत्तराखंड) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या ठाण्यासह पुणे, विशाखापट्टणम, कोलकाता या ठिकाणी शाखा होत्या. सर्वच शाखा अचानक एकाच दिवशी बंद करून संचालक पसार झाल्याने चांगल्या कंपनीत नोकरीला लागल्याचे समाधान अल्पावधीतच भंगल्याने अनेक तरुण आणि त्यांच्या पालकांच्या पायाखालची माती सरकली. जानेवारी २०१६ मध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई या परिसरांतील अनेक तरुणांनी एका नामांकित वेबसाइटवर झळकलेल्या जाहिरातीला भुलून तसेच काहींना मित्रांकडून मिळालेल्या माहितीआधारे पीसी टेक्नॉलॉजीत नोकरीसाठी संपर्क साधला.

तेव्हा, २ ते ११ जानेवारी २०१६ या कालावधीत प्रत्येकाच्या तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेतल्या. पहिल्या फेरीत २५ प्रश्नांची अर्ध्या तासांची पर्यायी उत्तरे असलेली परीक्षा घेतली. दुसरी तांत्रिक फेरी, तर अखेरची एचआर विभागाशी संबंधित होती. याच फेरीत त्यांना नोकरी पक्की झाल्याचे सांगून प्रशिक्षणासाठी २५ हजार रुपये धनाकर्षाने (डीडी) डेहराडून येथील कंपनीच्या बँक खात्यात भरण्याचे सांगण्यात आल्याचे घाटकोपर येथील तेजस भोर याने सांगितले. असाच अनुभव वडाळ्याच्या अंकिता खोत, ऐरोलीच्या सौरभ मांजरेकर यांना आला. एका चांगल्या ठिकाणी प्रोफेशनल प्रायव्हेट लि. कंपनी, प्रशिक्षणाचे पैसेही डीडीनेच भरल्यामुळे सर्वच सुशिक्षित बेरोजगारांचा विश्वास बसल्याचे मांजरेकर याने सांगितले.

 यातील अनेकांना ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनी’ या पदासाठी निवड झाल्याचे पत्र देऊन नंतर त्यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपये उकळल्याचे सांगण्यात आले. काहींना प्रशिक्षण भत्त्यापोटी सहा हजार रुपये देण्याचेही सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षभराने २५ हजारांची रक्कम परत करण्यात येणार होती. परंतु, नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही परत न करता कंपनीच्या संचालकांनी अचानक पलायन केल्याने याप्रकरणी भोर याच्यासह ठाण्यातील सुमारे ६०० तरुणांनी तक्रार दाखल केली आहे.

ठाण्यातील ६०० तरुणांचा विचार केल्यास ही रक्कम दीड कोटीच्या घरात जाते. देशभरातील तरुणांकडून अडीच ते तीन हजार तरुणांकडून सुमारे साडेसहा ते सात कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती अनेक तरुणांनी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर अधिक तपास करीत आहेत.

डेहराडूनच्या प्रशिक्षकाचीही फसवणूक या कंपनीत डेहराडून येथील सुमंत भटनागर यांच्यासह सहा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडूनही सुरुवातीला २० हजार रुपये घेतले. पुढे त्यांना १५ हजार रुपये वेतन दिले. नंतर, शेवटच्या दोन महिन्यांचे वेतनही मिळाले नसल्याचे भटनागर यांनी सांगितले. 

मालकाचा अपघात झाल्याची बतावणी कंपनीचा मालक यश राज याचा अपघात झाला असून तो रुग्णालयात आयसीयूत अत्यवस्थ अवस्थेत असल्याची बतावणी गेल्या काही दिवसांपासून अनेकांना केली जायची. त्यामुळे कोणीही पैशांची विचारणा करीत नव्हते. अनेकांना दिवसा प्रशिक्षण आणि रात्री बनावट प्रोजेक्टची नोकरी करण्यास भाग पाडले जात होते. अनेकांना १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर २५ हजार रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेतल्याचे आणि ती परत करणार असल्याचे लेखी दिल्यानेच अनेक जण यात अडकल्याची माहिती हितेन पाटील याने दिली. १३ ते २१ आॅगस्टदरम्यान कंपनीतील या कामगारांना सुटी दिली होती. २२ आॅगस्ट रोजी मात्र कंपनीला सील लागल्यानंतर हा प्रकार समोर आला

फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास अशा तरुणतरुणींनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी केले आहे. 

Web Title: Thousands of youths worth crores rupees in the name of job unrestrained training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.