मासे पक़डण्याच्या जाळ्य़ात आणि बोटीच्या पंख्यात अडकून दुर्मीळ कासवांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:32 PM2018-04-07T16:32:21+5:302018-04-07T16:55:31+5:30
कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या समुद्र किनाऱ्यावर होतो, त्याचठिकाणी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात.
जयंत धुळप, अलिबाग: मोठय़ा मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ्य़ात अडकून आणि बोटींच्या पंख्यात(ईम्पेलर) अडकल्यामुळे जखमी होऊन मृत पावणाऱ्या दुर्मिळ आणि केंद्रीय पर्यावरण विभागाकडून अतिसंरक्षित प्रजाती म्हणून घोषित ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासवांचे मृत्यू ही सागरी कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय कार्यरत पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांमध्ये मोठय़ा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या 20 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पाच तर अलिबागजवळच्या वरसोली सागर किनारी शनिवारी एक पूर्ण वाढ झालेले मृत ‘ऑलिव्ह रिडले’ सागरी कासव आढळले होते. तर गतवर्षी दिवेआगर सागर किनाऱ्यावरही दोन मृत कासवे आढळली होती.
कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या समुद्र किनाऱ्यावर होतो, त्याचठिकाणी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरीता येतात. हे या ऑलिव्ह रिडले या जातीच्या सागरी कासवांचे एक वैशिष्ठय़ असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक डॉ. वैभव देशमुख यांनी दिली. ऑलिव्ह रिडले या जातीच्या सागरी कासवांचे प्रमाण सागरी कासव संरक्षण व संवर्धन मोहीमेतून गेल्या 15 ते 16 वर्षात वृद्धिंगत होत असतानाच त्याच कासवांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मच्छिमारीला जाणाऱ्या बांधवांमध्ये जागृती करण्याची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. मुळात सागरी कासवे श्वसन प्रक्रियेकरीता समुद्राच्या वरच्या भागात येतात आणि हवेतील ऑक्सिजन घेत असतात. एकदा पाण्याच्यावर येऊन ऑक्सिजन घेतल्यावर पाण्याखाली ते 10 ते 15 मिनिटे राहू शकतात. या दरम्यान ही कासवे अनेकदा मासे पकडण्याच्या जाळ्य़ात अडकून आणि बोटींच्या पंख्याने अनेकदा जखमी होतात. आणि समुद्रात मृत झाल्यावर जवळच्या सागरी किनाऱ्यावर येऊन धडकतात. वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने सागरातील अपघात या कारणांमुळे सागरी कासवांचे जगण्याचे प्रमाण केवळ 10 टक्के असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.
दिवेआगरमध्ये गतवर्षी 367 तर यंदा आतापर्यंत 561 कासवाच्या पिल्लांचा जन्म
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे राऊंड ऑफिसर हरिश्चंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी 1क् ते 12 वनमजूर आणि निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी 2017 मधीस सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात 367 सागरी कासवाची अंडी दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात शोधून काढण्यात या चमूला यश आले त्यांचे संवर्धन करुन नवजात कासवांची पिल्ले पून्हा समुद्रात सोडण्यात आली. यंदा दिवेआगर सागर किनारी 10 घरटय़ांचे संरक्षण करण्यात आले,त्या पैकी पाच घरटय़ांतील 561 नवजात कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले असल्याचे नाईक यांनी सांगीतले.
भारतात सागरी कासवांची एकूण 5 कुळे व 31 जाती
भारतात सागरी कासवांची एकूण 5 कुळे व 31 जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये या सागरी कासवाचा समावेश होतो. भारतामध्ये त्यातील ‘लेदरबॅक’ ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकिबल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो.