हत्येचा धागा ‘सनातन’पर्यंत!

By admin | Published: September 17, 2015 03:23 AM2015-09-17T03:23:10+5:302015-09-17T03:23:10+5:30

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर जवळपास सात महिन्यांनी एका संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Threat to 'Sanatan' | हत्येचा धागा ‘सनातन’पर्यंत!

हत्येचा धागा ‘सनातन’पर्यंत!

Next

कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर जवळपास सात महिन्यांनी एका संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी पहाटे सांगली येथील समीर विष्णू गायकवाड (३२) याला अटक करण्यात आली असून, तो सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड हाच मारेकरी असल्याचा आजच्या घडीला आमचा दावा नाही; परंतु तो या प्रकरणातील महत्त्वाचा संशयित (क्लोज सस्पेक्ट) असल्याचे सांगतानाच तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याचे संजयकुमार यांनी स्पष्ट केले. गायकवाड याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची (२३ सप्टेंबर) पोलीस कोठडी दिली. नंतर प्रचंड बंदोबस्तात त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेले.
संजयकुमार हे बुधवार सकाळपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. अटकेची माहिती त्यांनी पोलीस मुख्यालयात दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली. संजयकुमार म्हणाले, की आम्हाला संशय आल्याने गेले सहा महिने आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. त्याच्या मोबाइल संभाषणातून (टेक्निकल सर्व्हेलन्स) या हत्येचा उलगडा होईल, असे काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. याच संशयावरून आणि पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रात्रभर चौकशी केल्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती पुढे आल्याने पहाटे साडेचार वाजता त्याला अटक करण्यात आली, असे ते म्हणाले. काम करतो. तो सांगलीत राहत असला तरी त्याची मुंबई व नवी मुंबई येथेही घरे आहेत. पोलिसांनी तेथील घरांची झडती सुरू केली आहे. पोलीस या हत्येशी संबंधित आणखी काही पुरावे व आणखी कोण या हत्येमध्ये सहभागी होते का, या दिशेने तपास करीत असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, ही माहिती संजयकुमार यांनी पत्रकार परिषद संपता संपता दिली. त्यांना गायकवाड हा कोणत्या धार्मिक संस्था-संघटनेशी संबंधित आहे का, अशी थेट विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही त्याची चौकशी करीत असल्याचे प्रारंभी सांगितले. थोड्या वेळाने गायकवाड याचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का, अशी विचारणा झाल्यावर मग त्यांनी ‘सनातन’ कनेक्शन उघड केले. सनातन संस्थेच्यावतीने मुंबईत गेल्या पाच-सहा दिवसांत धर्मरथ फेरी काढण्यात आली होती. हा धर्मरथ चालविण्याचे काम समीर गायकवाड करीत होता, असे संजयकुमार यांनी सांगितले.

‘सनातन’वर बंदीची काँग्रेसची मागणी
पानसरे हत्याकांडात अटक झालेला पहिला संशयित सनातन संघटनेचा असल्याने हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या कट्टरवादी संघटना असण्याच्या संशयाला अधिक बळ मिळाले असून, सरकारने तातडीने या संघटनेवर बंदी घालून पानसरे व दाभोळकर यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

कसा सापडला गायकवाड...
गायकवाड हा वारंवार मोबाइल नंबर बदलतो. त्याने आतापर्यंत किमान २२ मोबाइल नंबर बदलले असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांपर्यंत आली होती. त्यावरून पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले व संभाषणावर पहारा ठेवला. तो पत्नीशी मोबाइलवर या हत्येच्या अनुषंगाने बोलल्याचे काही ठोस धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी त्याला उचलले असल्याचे समजते.

हत्येशी माझासंबंध नाही...
गायकवाड याला न्यायालयाने तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर त्याने माझा पानसरे हत्येशी काही संबंध नसून, मी दीड-दोन महिने बाहेर होतो, असे सांगितले.

पानसरे यांच्यावर गेल्या १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी मोटारसायकलवरून येऊन समोरून गोळ्या घातल्या होत्या. त्यामध्ये पानसरे व त्यांच्या पत्नी उमा या गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना पानसरे यांचे मुंबईत २० फेब्रुवारीस निधन झाले; परंतु त्यांचे मारेकरीच सापडत नसल्याने राज्य सरकारसह पोलीस खात्यावरही मोठा दबाव होता.
या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला मुंबईहून तर, अन्य तिघांना गोवा आणि पुण्याहून ताब्यात घेतले. तसेच शूटर हा गोव्याचा असल्याचे समजते. कोल्हापूर पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला आहे.

समीर सनातनचा पूर्णवेळ साधक असून तो निष्पाप व निर्दोष आहे. यापूर्वीही दाभोलकर हत्यप्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी झाली होती, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. लवकरच सत्य बाहेर येईल. समीरला गुन्हात रोवण्यासाठी पोलिसांनी हा बनाव रचला आहे.
- वीरेंद्र मराठे, सनातन संस्था

 

Web Title: Threat to 'Sanatan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.