अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; उघड धमकीनं माजली खळबळ, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:32 IST2023-04-12T14:30:45+5:302023-04-12T14:32:31+5:30
अण्णा हजारेंसह प्रशासनाला निवेदन देऊनही पदरी निराशा लागली आहे. त्याच संतप्त भावनेने संतोष गायधने याने १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असा इशारा दिला आहे.

अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; उघड धमकीनं माजली खळबळ, काय आहे प्रकरण?
अहमदनगर - राज्यासह देशभरात उपोषण आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करणार अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. उघडपणे दिलेल्या या धमकीने राज्यात खळबळ माजली आहे. शेती वादातून खोट्या केसेस दाखल झाल्यानं कुटुंब दहशतीत जगत आहेत. अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री यांना निवेदन दिल्यानंतरही काहीच होत नसल्याने संतोष गायधने या व्यक्तीने अण्णा हजारेंना मारण्याची धमकी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात संतोष गायधने यांची शेत जमीन आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेती वादातून गायधने कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना आहे. अण्णा हजारेंसह प्रशासनाला निवेदन देऊनही पदरी निराशा लागली आहे. त्याच संतप्त भावनेने संतोष गायधने याने १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असा इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावात संतोष गायधने यांची शेतजमीन आहे. या शेतीच्या वादातून ९६ जणांनी मिळून गायधने कुटुंबावर दबाण आणला आहे. विविध मार्गाने खोट्या केसेस दाखल करून कुटुंबाचा मानसिक छळ सुरू आहे. त्यामुळे कुटुंब दहशतीखाली जगत आहे. शेती वाद आणि खोट्या केसेस या भीतीने गायधने कुटुंबाने टोकाची भूमिका घेतली आहे.
मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अण्णा हजारे यांना निवेदन देऊनसुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने गायधने कुटुंब संतप्त झाले आहे. त्यातून या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्याचसोबत १ मे रोजी अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत जाऊन हत्या करणार असा इशारा संतोष गायधने याने दिला आहे. मात्र अण्णा हजारेंना दिलेल्या हत्येच्या धमकीने प्रशासनात खळबळ माजली आहे. त्याचसोबत अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी अण्णा समर्थकांना केली आहे.