राजकीय नेत्यांना धमकी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:29 PM2023-06-09T12:29:26+5:302023-06-09T12:30:44+5:30
शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तुमचाही दाभोळकर होणार अशा आशयाची धमकी पवारांना देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. शरद पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली. आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई करतील. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आला.
या प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तात्काळ या व्यक्तींना अटक करावी अशी मागणीही केली आहे. गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेष बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण एडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या कॉमेंट वाचल्या एवढा द्वेष कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.