एटीएम नंबरसाठी महिलांना धमक्या
By admin | Published: June 8, 2017 06:30 AM2017-06-08T06:30:17+5:302017-06-08T06:30:17+5:30
बँकेचा एटीएम नंबर मागण्यासाठी महिलांना अनोळखी इसमाकडून मोबाईलवर धमक्या दिल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : बँकेचा एटीएम नंबर मागण्यासाठी महिलांना अनोळखी इसमाकडून मोबाईलवर धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
बँकेतून बोलत असून, तुमचे एटीएम कार्डाचे नुतनीकरण करायचे असल्याने कार्ड नंबर सांगा अशी मागणी करणारे फोन नालासोपारातील काही महिलांना येत आहेत. स्वत:चे नाव दीपक शर्मा असल्याचे सांगणारा इसम स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगतो. ८६५१७७७५९७ या मोबाईल नंबरवरून फक्त महिलांनाच टार्गेट केले जात आहे. बँक व्यवहाराची माहिती नसलेल्या आणि एटीएम कार्ड वापरणाऱ्या महिलांना तो सावज करीत आहे.
कार्डाचा नंबर न देणाऱ्या महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत असल्याचेही उजेडात आले आहे. आचोळे रोड येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेला शर्माने फोन केला होता. पण, सदर महिलेने शर्माला दाद न दिल्याने त्याने अश्लिल शिगीवाळ करीत धमक्या दिल्या. याप्रकरणी तिच्या पतीने त्याच नंबरवर फोन करून जाब विचारला असता त्यांना धमकी दिली गेली. याप्ररकणी सदर महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.