एक लाखाच्या खंडणीसाठी धमकी देणारा पत्रकार अटकेत

By admin | Published: July 13, 2017 08:32 PM2017-07-13T20:32:57+5:302017-07-13T20:32:57+5:30

वस्तू प्रदर्शन विक्री मेळावा केंद्र बंद पाडण्याची धमकी देऊन एका महिलेला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या नवी मुंबईतील स्थानिक कथित पत्रकार

Threatening journalist for ransom of one lakh | एक लाखाच्या खंडणीसाठी धमकी देणारा पत्रकार अटकेत

एक लाखाच्या खंडणीसाठी धमकी देणारा पत्रकार अटकेत

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 13 - वस्तू प्रदर्शन विक्री मेळावा केंद्र बंद पाडण्याची धमकी देऊन एका महिलेला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या नवी मुंबईतील स्थानिक कथित पत्रकार सुरेश मंगळूरकर याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

अंबरनाथ येथील रहिवासी असलेली कविता रंगरेज (रेड्डी) ही महिला गेल्या काही वर्षांपासून विवेक सावंत (रा. अंबरनाथ) यांच्या भागीदारीतून कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ आणि नवी मुंबई परिसरांत हॅण्डलूम वस्तूंचे प्रदर्शन विक्रीचा मेळावा भरवत असते. ठाण्यातही गावदेवी मैदान येथे त्यांनी २२ जून ते १६ जुलै २०१७ या २६ दिवसांसाठी ठाणे महापालिकेतून रीतसर ९०० रुपये प्रतिदिवस याप्रमाणे २५ हजार रुपये रोख भरणा करून परवानगी घेऊन हे प्रदर्शन भरवले आहे. मंगळूरकर याने मात्र या मैदानात हे प्रदर्शन भरवण्याची तुमची रीतसर परवानगी नसून ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुमचे आधीचे नवी मुंबईचे पैसे धरून आता एक लाख ६० हजार रुपये द्या, अशी त्याने त्यांच्याकडे मागणी केली. यात तडजोडीअंती ९ जुलै रोजी ६० हजार आणि २२ जुलै रोजी ५० हजार असे एक लाख १० हजार रुपये देण्याचे ठरले.

मात्र, ६० हजारांची रक्कम ९ जुलै रोजी देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवून आणखी वेळ मागितला. तेव्हा, त्याने दमदाटी करून त्यांना फोनवरून खंडणीसाठी धमकी दिली. यापूर्वीही त्याने नवी मुंबईतील प्रदर्शन केंद्र बंद पाडण्याची धमकी देत १८ मे २०१७ रोजी कविता यांचे भागीदार विवेक सावंत यांच्याकडे दोन लाखांची मागणी करून २५ हजार रुपये उकळले. आता पुन्हा माहिती अधिकाराचा गैरवापर करून त्याने खंडणीसाठी त्यांना धमकावले. या सर्व प्रकाराला कंटाळून त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने त्याला गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ऐरोलीतील त्याच्या घरातून त्याला अटक केली.

Web Title: Threatening journalist for ransom of one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.