बलात्कारीत मुलीच्या पालकांना धमक्या
By admin | Published: January 23, 2017 06:00 AM2017-01-23T06:00:33+5:302017-01-23T06:00:33+5:30
आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कुटुंबीय
मुंबई : आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार मालाड येथील आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली असून, पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
मालाड (पूर्व) येथे राहाणारी पीडित मुलीची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तिची सोळी वर्षीय गतिमंद मुलगी २१ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने दुसऱ्या दिवशी दिंडोशी पोलीस ठाण्यात मिसिंग कम्लेंट दाखल करण्यात आली. सगळीकडे शोध सुरू असतानाच मालवणी येथील एका व्यक्तीने आपण त्या मुलीला दाणापाणी परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी पालकांनाच शोध घेण्यास सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी मुलगी पालकांनाच दाणापाणी परिसरात फिरताना आढळली. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीकडे केलेल्या चौकशीत राहुल गेचंद, नितीन सारसर, नवीन सारसर, बॉबी गुस्सार आणि विजय गुस्सार यांनी बलात्कार केल्याचे निदर्शनास आल्याने दिंंडोशी पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
आरोपींनी मुलीला दाणापाणी येथे नेऊन सोडल्यानंतर, ती सापडेपर्यंतच्या कालावधीत आरोपी दररोज रात्री रिक्षाने तेथे जाऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करीत, असे तपासात आढळले. पाच आरोपींव्यतिरिक्त आणखी दोन आरोपी असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा मुलीच्या पालकांचा आरोप आहे. दरम्यान, या पालकांना आरोपींचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत आहेत, तसेच अज्ञात इसमांमार्फत त्यांचा पाठलाग सुरू असल्याने पोलिसांनी पालकांना पोलीस संरक्षण पुरवावे, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिले आहे. २३ जानेवारी ही आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असतानाही तपास वेगाने होत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)