‘सात-आठ वाजल्यानंतरच्या बैठका कमी करा, म्हणजे धमक्या येणं कमी होईल’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:04 PM2021-12-23T16:04:23+5:302021-12-23T16:05:15+5:30
Threats to Aditya Thackeray: भाजपा आमदार Nitesh Rane यांनी Aditya Thackeray यांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. तसेच धमक्या येऊ नयेत म्हणून आदित्य ठाकरे यांना खोचक सल्लाही दिला.
मुंबई - राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजला. दरम्यान, आदित्य ठाकरेंना आलेली धमकी ही कर्नाटकमधून आल्याने त्याच्याशी तेथील सत्ताधारी असलेल्या भाजपाचा संबंध जोडून सत्ताधारी गट सभागृहात आक्रमक झाला होता. दरम्यान, आजच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. तसेच धमक्या येऊ नयेत म्हणून आदित्य ठाकरे यांना खोचक सल्लाही दिला.
नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी दिली हे विचारा. धमकी देण्यासारखी आदित्य ठाकरे नेमकी कृती करतात काय? त्यांनी सात आणि आठ वाजल्यानंतरच्या बैठका कमी कराव्यात, म्हणजे धमक्या कमी होतील, असा टोला नितेश राणेंनी लगावला.दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या विधिमंडळातील अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी सांगितले की, ते आजारी आहेत, असं आम्ही ऐकलंय. ते लवकर बरे व्हावेत, अशी आमची प्रार्थना आहे. मात्र त्यांना जर काम करायला जमत नसेल तर त्यांनी जबाबदारी कुणा अन्य मंत्र्याकडे द्यावी किंवा राजीनामा द्यावा. मात्र सध्या त्यांच्या कुणावर विश्वास नाही असं दिसतंय, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
यावेळी नितेश राणेंनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही डिवचले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, पहिलं शिवसेनेनं ठरवावं की ते हिंदुत्वाच्या बाजूने आहेत की, ते सेक्युलॅरिझमच्या बाजूने आहेत. कधी त्यांना सेक्युलॅरिझम पाहिजे असतो. कधी त्यांना धर्मनिरपेक्ष बनायचं असतं. तर कधी ते हिंदुत्वाच्या मागे जातात. अशा दोन्ही बाजूला लटकणाऱ्या लोकांना, मधल्या लोकांना समाजात काय म्हणतात याबाबत जरा विचार करा. शिवसेनेची भूमिका नेमकी कोणती याबाबत शिवसेनेनं, सामनाने भूमिका स्पष्ट करावी. बाकी मधले असतील तर त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या झेंडा घेऊन उभे आहोत, या शिवसेनेच्या विधानावरूनही नितेश राणेंनी टोला लगावला. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे विधान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तोंडावर जाऊन म्हणावं. जेव्हा शिवसेना असं विधान राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या समोर म्हणून दाखवेल, तेव्हा आम्ही त्यांना मानू. बाकी सामनाच्या ऑफिसमधलं हिंदुत्व आम्हाला नको आहे, असेही नितेश राणे म्हणाले.