अंबाबरव्यातील चोेरट्या मार्गासाठी वनसंरक्षकांना धमक्या!

By admin | Published: April 27, 2017 12:05 AM2017-04-27T00:05:02+5:302017-04-27T00:05:02+5:30

‘पाचोरी’ ग्रामस्थांची दादागिरी : जंगलाला आग लावण्याचाही प्रकार

Threats to the forest guard for the four-way road! | अंबाबरव्यातील चोेरट्या मार्गासाठी वनसंरक्षकांना धमक्या!

अंबाबरव्यातील चोेरट्या मार्गासाठी वनसंरक्षकांना धमक्या!

Next

राजेश शेगोकार -अकोला
अंबाबरव्याचा सन २००० मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात, तर २००६ अतिसंरक्षित गाभा क्षेत्र (कोअर एरिया)मध्ये समावेश करण्यात आल्याने या अभयारण्यातील पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामध्ये अंबाबरवा या गावाचाही समावेश आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अंबाबरवा या गावातून पाचोरी येथील अवैध शस्त्रांची तस्करी केली जात असे. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे पाचोरी येथील तस्कारांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी या आदिवासीबहुल खेड्यात मध्य प्रदेश पोलीस आणि देशी कट्ट्याच्या सूत्रधारामध्ये सोमवारी सकाळी चकमक घडली होती. या घटनेमुळे पाचोरी गाव पुन्हा चर्चेत आले असून, आता या गावातील अवैध शस्त्रास्त्रांचे तस्कर व्याघ्र प्रकल्प विभागावर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेला लागून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या टोकावर मध्य प्रदेशात ‘पाचोरी’ नावाचे गाव आहे. पाचोरी गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंबाबरवा अभयारण्याच्या सीमेपासून केवळ तीन कि.मी. अंतरावर आहे. २२ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील पाचोरीच्या काही ग्रामस्थांनी अंबाबरवा अभयारण्यात येऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या काही वनरक्षक तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या चमूला येऊन धमकावल्याची तसेच ‘आम्ही जंगल जाळून टाकू, जंगलातील सर्व पाणवठ्यांवर विषप्रयोग करण्याची धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, २२ एप्रिलच्या सायंकाळी पाचोरीच्या गावकऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनधिकृ त प्रवेश करून जंगलात आगसुद्धा लावली. बिनतारी संदेशावर माहिती मिळताच दौऱ्यावर असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक प्रमोद चांद लाकरा यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. काही तासांतच आग नियंत्रणात आली.
यापूर्वीसुद्धा ३ फेब्रुवारी २०१४ रोजी गावातील एक टोळी शिकार करण्यासाठी आली असताना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनरक्षकावर त्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे सध्या अंबाबरवा अभयारण्यात बंद झालेला चोरटा मार्ग पाचोरी ग्रामस्थ दहशतीच्या बळावर सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.
पाचोरी गावाचे महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी गावाशी थेट संबंध असल्याची नोंद आहे. अंबाबरवा गावाचे यशस्वी पुनर्वसन झाल्याने पाचोरी गावकऱ्यांचा व्यापाराचा मुख्य रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे हा बंद झालेला रस्ता सुरू करण्यासाठी असे धमकीचे व दहशतीचे तंत्र वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलिसांनाही कळविण्यात आल्याची माहिती आहे.

स्वेच्छा पुनर्वसनाचा पॅटर्न
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येताना दिसत आहे. अंबाबरवा गावाने याच माध्यमातून एक नवा पायंडा पाडला आहे. ‘स्वेच्छेने पुनर्वसन’ हा प्रयोग आता मेळघाटसारख्या भागात रुजला आहे. स्थानिक आदिवासी गावकरी व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकाराने अकोट वन्यजीव विभागातील आजवर पाच गावांचे यशस्वी पुनर्वसन झाले आहे. त्यांनी पुनर्वसनासाठी केलेले कामगाज उल्लेखनीय आहे. आजवर कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु.), सोमठाणा (खु.), केलपाणी व चुनखडी एकूण १५ गावांचे यशस्वी पुनर्वसन झालेले आहे. महाराष्ट्रातील या सर्व आदिवासी बांधवांनी मेळघाटला मोकळा श्वास दिला आहे.

असे आहे अंबाबरवा
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्याचे क्षेत्र आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, अस्वल, कोल्हा, गवा, सांबर, भेडकी, ससा, उदमांजर हे प्राणी आहेत. मोर, हरोळी, नाचन, स्वर्गीय नर्तक, टाकचोर, पिंगळा, रातवा यांच्यासह २०० च्यावर पक्षी असून, फुलपाखरे व इतर कीटकांसह येथील जैवविविधता समृद्ध आहे.

असे आहे पाचोरी
मध्य प्रदेशातील पाचोरी हे गाव अवैध काडतुसे, देशी कट्टे व इतर शस्त्र निर्मिती व त्याच्या अवैध व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची माहिती आहे. येथे बनलेले देशी कट्टे दिल्ली, नागपूर, नांदेड, खंडवा यासह अनेक ठिकाणी छाप्यात आढळली असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचे थेट संबंध अनेक घातक कारवाया करणाऱ्या देशातील टोळ्यांशी आहेत.

वाघ व इतर वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे चोरटे मार्ग बंद झाले. आता अशा चुकीच्या मार्गासाठी थेट कायदा हातात घेऊन पाचोरी येथील ग्रामस्थ धमक्या देत आहेत. याबाबची माहिती वरिष्ठांना दिली असून, मुख्य वनसंरक्षक तथा प्रकल्प संचालक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.
- प्रमोद चांद लाकरा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती.

वाघासाठी अंबाबरवा व इतर गावांनी स्वेच्छेने पुनर्वसन प्रक्रियेला गती दिली. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्य जीवनाला सुगीचे दिवस आले आहेत. वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे अधिकाऱ्यांचे मनोबल कमी होते, त्यामुळे दोन्ही राज्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली पाहिजे.
- यादव तरटे पाटील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रश्नांचे अभ्यासक, अमरावती.

Web Title: Threats to the forest guard for the four-way road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.