तटकरेंची एसीबीत साडेतीन तास चौकशी
By admin | Published: October 21, 2015 03:25 AM2015-10-21T03:25:59+5:302015-10-21T03:25:59+5:30
कोंढाणे धरण प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी साडेतीन तास
मुंबई : कोंढाणे धरण प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी साडेतीन तास चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित गैरव्यवहारांच्या खुल्या चौकशीचे आदेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिले होते. वरळीतील एसीबीच्या मुख्यालयात झालेल्या या चौकशीसाठी तटकरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांची प्रथमच व्यक्तिश: भेट घेतली. चौकशीत तटकरे यांनी सहकार्य केले असून पुढेही होणाऱ्या चौकशीत ते सहकार्य करणार असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी तटकरे यांना एसीबीने १५ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. त्याचवेळी एसीबीने तटकरे किंवा त्यांचा वकील उपस्थित राहू शकेल, अशी सवलत दिली होती. मात्र या वकिलाला आर्थिक व्यवहारांची माहिती असली पाहिजे अशी अट घातली होती. ‘‘मला एसीबीने चौकशीसाठी बोलावले होते व त्या कामी मी त्यांना सहकार्य करीत आहे. पुढेही मी ते करीन’’, असे तटकरे यांनी एसीबी मुख्यालयातून बाहेर येताना सांगितले. सकाळी ११ वाजता तटकरे एसीबी मुख्यालयात आले व त्यांची पहिल्या मजल्यावर दुपारी अडीच वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चौकशी अधिकारी सुनील कलगुटकर आणि अन्य २-३ अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
एसीबीचे महासंचालक विजय कांबळे यांनी तटकरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा कोणताही तपशील सांगण्यास नकार दिला. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे (केआयडीसी) तटकरे अध्यक्ष असताना प्रकल्पाचा खर्च अनेक पटींनी कसा वाढला याची खुली चौकशी एसीबी करीत आहे. या प्रकरणात एसीबीने अजून कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही.