कोट्यवधी गुंतवणूकदार फसवणुकीतील महेश मिरजकरसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:03 PM2018-08-04T23:03:31+5:302018-08-04T23:16:11+5:30
नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गत पंधरवड्यापासून फरार असलेला मिरजकर ज्वेलर्सचा संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी व संचालक हर्षल नाईकची पत्नी कीर्ती नाईक या तिघांना शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने औरंगाबाद रोड तसेच इंद्रकुंडावरून शनिवारी (दि़४) अटक केली़ जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार असल्याने हे तिघेही नाशिकमध्ये आले होते़
नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गत पंधरवड्यापासून फरार असलेला मिरजकर ज्वेलर्सचा संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी व संचालक हर्षल नाईकची पत्नी कीर्ती नाईक या तिघांना शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने औरंगाबाद रोड तसेच इंद्रकुंडावरून शनिवारी (दि़४) अटक केली़ जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार असल्याने हे तिघेही नाशिकमध्ये आले होते़
अॅड़ पल्लवी हर्षल उगावकर (३०, रा. शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात २० जुलै २०१८ रोजी मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स या दोन्ही फर्मचे संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परीक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक यांनी १३ एप्रिल २०१५ ते १ फेब्रुवारी २०१७ गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून १ कोटी २२ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती़ या प्रकरणी या अकराही संचालकांवर एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़
मिरजकर फसवणूक प्रकरणात आतापर्यंत २५० गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे़ तर, बेपत्ता हर्षल नाईक याने पोलीस आयुक्तांना कुरिअरद्वारे पाठविलेल्या यादीत शहरातील नामांकित व्यक्तींचे २७ कोटी रुपये देणे असल्याचे म्हटले होते़ या फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या संचालकांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती़ मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी या सर्वांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत शनिवारी (दि़४) अंतिम सुनावणी होणार होती़ मात्र, न्यायाधीश रजेवर असल्याने यातील काही संशयितांना अंतिम निर्णयासाठी ७ आॅगस्ट तर काहींना १० आॅगस्ट ही तारीख देण्यात आली आहे़
आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात एकमेव आशितोष चंद्रात्रे यास अटक केली असून, त्यास सोमवार (दि़६)पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे़ तर उर्वरित फरार संचालकांनी न्यायालयात टाकलेल्या अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होती़ या सुनावणीसाठी फरार संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी व बेपत्ता हर्षल नाईकची पत्नी कीर्ती नाईक हे शहरात आले होते़ त्यांच्या मागावर असलेल्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर व त्यांच्या पथकाने या तिघांना अटक केली़ या गुन्ह्यातील प्रमुख संचालक व अकौंटंट यांना अटक झाल्याने गुंतवणूकदारांची संख्या व फसवणुकीची रक्कम याचा खुलासा होणार आहे़ या तिघांनाही उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
गुन्हे शाखेची कारवाई
जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी असल्याने फरार महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक हे नाशिकमध्ये आले होते़ विशेष म्हणजे मोबाइलचा कोणताही वापर न करता तसेच न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता त्यांनी नातेवाइकांना पुढे केले होते़ तर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, अभिजित सोनवणे, रवि सहारे, पोलीस शिपाई ताजणे, अहिरे तसेच महिला पोलीस शिपाई ललिता अहिरे हे नातेवाइकांच्या मागावर होते़ न्यायालयाने सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले असते तर हे सर्व हजर राहणार होते़ मात्र, न्यायाधीश देशमुख हे सुटीवर असल्याने यामध्ये तारीख देण्यात आली़ पोलिसांनी औरंगाबाद रोडवरील जनार्दन स्वामी मठाजवळ थांबलेल्या महेश मिरजकर, कीर्ती नाईक या दोघांना ताब्यात घेतले़ तर मिरजकर सराफमध्ये अकौंटंटचे काम करणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी या आई-वडिलांना भेटण्यासाठी पंचवटीतील इंद्रकुंडावर आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आले़
तीनशे लोकांनी नोंदविले जबाब
मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत तीनशे लोकांनी जबाब नोंदविले असून, फसवणुकीची रक्कम सुमारे १४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे़ या तक्रारदारांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ६० अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असून, त्यांची फसवणुकीची रक्कम ४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे़
- विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, नाशिक