सैन्याचे तीन कर्मचारी ताब्यात!
By Admin | Published: March 3, 2017 05:38 AM2017-03-03T05:38:31+5:302017-03-03T05:38:31+5:30
सैन्य भरती पेपरफुटी घोटाळ्यामध्ये गुरुवारी नागपूर येथून सैन्य दलाच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
ठाणे : ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती पेपरफुटी घोटाळ्यामध्ये गुरुवारी नागपूर येथून सैन्य दलाच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापा टाकून २१ आरोपींना अटक केली. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील (एरिया रिक्रुटमेंट आॅफीस) कर्मचारी धरमवीरसिंग, रवीकुमार आणि निगमकुमार पांडे यांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुरुवारी तिघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. या कारवाईसाठी ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नागपूर येथे गेले होते. हे पथक तिघांनाही घेऊन शुक्रवारी ठाण्यात दाखल होईल.
दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन सीबीआयकडे याचा तपास सोपविला जाणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप याबाबत कोणताही अधिकृत पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)